बेळगाव : कर्नाटक विधानसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या बेळगाव शाखेने घेतला आहे. जिल्हा कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते ऍड. नागेश सातेरी हे होते.
बेळगाव दक्षिण मतदार संघातील समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर, बेळगाव उत्तर मतदार संघातील उमेदवार ऍड. अमर यळ्ळूरकर, बेळगाव ग्रामीण मतदार संघातील उमेदवार आर. एम. चौगुले, खानापूर मतदार संघातील उमेदवार मुरलीधर पाटील, यमकनमर्डी मतदार संघातील उमेदवार मारूती नाईक आणि निपाणी मतदार संघातील उमेदवार जयराम मिरजकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्या त्या मतदार संघातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समितीच्या उमेदवारांचा प्रचार करून त्यांना विजयी करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
भाजप उमेदवारांचा पराभव करण्यासाठी राज्यभर भारतीय कम्युनिस्ट पक्ष प्रयत्नशील आहे. सीमाभागात म. ए. समिती भाजपचा पराभव करू शकते आणि म्हणून समितीच्या पाठीशी भाकपच्या कार्यकर्त्यांनी उभे राहावे, असा निर्णय पक्षाने घेतला आहे. नजिकच्या काळात मतदार संघनिहाय कार्यकर्त्यांचे मेळावे
घेण्यात येतील आणि त्यांना सक्रिय करण्यात येईल.
असंघटित कामगार क्षेत्रात कम्युनिस्ट पक्षाचे कार्य आहे. अंगणवाडी कर्मचारी, माध्यान्ह आहार कर्मचारी, आशा कर्मचारी तसेच संघटित वर्गातील एस. टी. महामंडळाचे कामगार, हिंदुस्थान लेटेक्स या कंपनीचे कामगार आयटक या कामगार संघटनेशी निगडीत आहेत. त्यांच्याही स्वतंत्र सभा घेऊन त्यांना पक्षाची निवडणूक विषयक भूमिका सांगण्याचे कार्य लवकरच करण्यात येणार आहे. सध्याचे वातावरण पाहता सीमाभागात भाजपला एकही जागा मिळणार नाही.
Belgaum Varta Belgaum Varta