बेळगाव : जगी ज्यास कोणी नाही, त्याच्यासाठी देव (परमेश्वर) आहे असे मानले जाते. अर्थात परमेश्वराच्या कृपेनेच काही व्यक्तींनी समाजाप्रती असलेल्या सदभावनेतून स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. कोणतीही सार्वजनिक आपत्ती असो किंवा वृद्ध आणि अनाथ व्यक्तींवरील अंत्यसंस्कार जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन या कार्यात नेहमीच त्यांचा पुढाकार असतो. याचेच प्रत्यंतर आज घडले.
विजयनगर येथील जयवंत पाटील यांच्या सावली वृद्धाश्रमातील सरस्वती खाजू खानगावकर (वय ६६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या तीन वर्षापासून त्या येथे राहत होत्या. आज दि. २ मे रोजी सकाळी ९.३० वा. आश्रमाचे संस्थापक जयवंत पाटील यांनी समाजसेविका माधुरी जाधव यांना सरस्वती खनगावकर या वृद्ध महिलेच्या निधनाची माहिती दिली. माहिती मिळताचं माधुरी जाधव यांच्यासह सुळगा (उ.) ग्रा. पं. सदस्य शट्टूप्पा (बाळू) पाटील, शुभम दळवी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गत तीन वर्षांपूर्वीच या अनाथ वृद्ध महिलेची समाजसेविका माधुरी जाधव यांनीच सावली वृद्धाश्रमात राहण्याची सोय केली होती. आज तिच्या निधनानंतर माधुरी जाधव यांनी दुःख व्यक्त केले. यानंतर शववाहिकेची व्यवस्था करून सरस्वती आजींवर शहरातील सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याकरिता बेळगावचे माजी महापौर तथा सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे, शंकर कांबळे यांनी सहकार्य केले.
Belgaum Varta Belgaum Varta