बेळगाव : शहरवासियांची तहान भागविणाऱ्या राकसकोप जलाशयामधील पाणी पातळी खालावत चालल्याने पाणीपुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. मात्र आता राकसकोप जलाशयात केवळ पावणे सात फूट पाणीसाठा शिल्लक राहिला असून वीस दिवस पुरेल इतके पाणी शिल्लक आहे. पण यंदा वळीव पावसाने दडी दिल्याने पाणी समस्या गंभीर बनली आहे.
शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी राकसकोप जलाशयावर अवलंबून रहावे लागते. मागील वर्षी भरपूर पाऊस झाल्याने जलाशय तुडुंब भरून वाहत होता. पण यंदा वळीव पाऊस पडला नसल्याने पाणी समस्या निर्माण झाली आहे. एलऍण्ड टी कंपनीने मार्च महिन्यापासूनच पाणी कपात लागू करून गळत्या निवारण करण्याचे काम हाती घेतले होते. यंदा पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा करून पाणी पुरवठ्याबाबत खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. तरीदेखील यंदा वळीव पावसाने दडी दिल्याने पाणी पातळी वाढली नाही. सध्या राकसकोप जलाशयाची पाणी पातळी २४५३ फूट ४ इंच आहे. तर मागील वर्षी २४५८ फूट ९ इंच होती. मागील वर्षीच्या तुलनेत पाच फुटाने पाणी साठा कमी आहे. यामुळे आणखी वीस दिवस पुरेल इतकाच पाणी साठा जलाशयामध्ये शिल्लक आहे.
यंदा एप्रिल महिन्यापासून पाणीसमस्या निर्माण झाली असून पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होत आहे. यंदा वळीव पाऊस पडला नसल्याने पाणी समस्या तीव्र बनली आहे. सध्या वळीव पावसाचे वातावरण निर्माण होत आहे. पण पाऊस पडत नाही. त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी पाणी समस्या टाळण्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्याची आवश्यकता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta