Monday , April 20 2026
Breaking News

रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज; मराठी भाषिकांचा निर्धार!

Spread the love

 

बेळगाव : गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्र एकीकरण समितीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. विधानसभा निवडणुकीत समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी याचा कोणताही परिणाम सीमालढ्यावर होणार नाही. आगामी काळात सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेण्यासाठी अधिक ताकदीने लढण्याचा निर्धार मराठी भाषिकांतून केला जात आहे.
भाषावार प्रांतरचना झाल्यापासून सीमाप्रश्नाची सोडवणूक करुन घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिकांचा लढा सुरू आहे. सीमालढ्याचा एक भाग म्हणून समितीने आतापर्यंत वेगवेगळ्या निवडणुका लढविल्या आहेत. या निवडणुकांमध्ये कधी यश तर कधी अपयश मिळाले आहे. मात्र, मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची जिद्द थोडीही कमी झालेली नाही. यावेळी प्रत्येक मतदारसंघात समितीने एकच उमेदवार दिला होता, तरीही समितीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांकडून समितीला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, समितीने कधीही निवडणूक हे आपले ध्येय ठेवले नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे हेच समितीचे मुख्य ध्येय आहे. त्यामुळे निवडणुकीतील पराभवामुळे आलेली निराशा दूर सारुन पुन्हा एकदा समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी लवकर व्हावी. साक्षी पुरावे नोंदविण्याच्या कामाला सुरुवात व्हावी याकडे समितीने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. समितीला यापूर्वीही निवडणुकांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मात्र, समिती किंवा येथील मराठी भाषिक कधीही लढ्यापासून दूर गेलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पराभवामुळे आलेली मरगळ झटकून नव्याने लढ्यासाठी उभे राहावे. कार्यकर्त्यांनी निराशा झटकून मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करून घेण्यासाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे मत व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘प्यास’तर्फे सुळगा येथे तलाव पुनरुज्जीवन प्रकल्पाचा शुभारंभ

Spread the love  बेळगाव : प्यास फाउंडेशन या संस्थेने बेळगाव तालुक्यातील सुळगा गावामध्ये या वर्षातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *