बेळगाव : “बेळगाव शहरातील मराठी माध्यमातील मुलींची अग्रेसर शाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या महिला विद्यालय या संस्थेला येत्या 27 मे रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शतक महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय संस्थेच्या वतीने घेण्यात आला आहे”अशी माहिती संस्थेचे चिटणीस ऍड. श्री. विवेक कुलकर्णी यांनी बोलताना दिली.
यासंदर्भात ते म्हणाले की ,”25 मे 1923 रोजी संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 27 मे 1923 रोजी महिला विद्यालय हायस्कूल सुरु करून बेळगाव सारख्या शहरात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ करण्यात आली. कै. बनूताई आहो यांच्या साथीने महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी सुरू केलेल्या या संस्थेचा शतक महोत्सव यावर्षी आम्ही साजरा करीत असून दि. 27 व 28 मे असे दोन दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावच्या इतिहासात अविस्मरणीय ठरणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेच्या शेकडो विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. मात्र या उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या उपस्थितीची नोंद करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी शाळेचे विद्यमान प्राचार्य श्री. विश्वनाथ पाटील यांना 9844033752 या क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी करावी. 27 मे रोजी शतकोत्तर महोत्सवी कार्यक्रम होणार असून व 28 मे रोजी माजी विद्यार्थिनींचा मेळावा होणार आहे. यानिमित्ताने एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी सर्व विद्यार्थिनींनी आपल्या आठवणी किंवा लेख दि. 25 मे पर्यंत पाठवावेत असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta