बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने दहावी व बारावीच्या शहरात सर्वप्रथम आलेल्या प्रतिभावंत विद्यार्थ्यांचा सन्मान रविवारी सायंकाळी जी. जी. सी. सभागृहात आयोजिण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून जी. एस्. एस्. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ सदस्य प्राचार्य व्ही. एन्. जोशी व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी सहसचिव विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम् सादर केले. मान्यवरांच्या हस्ते भारत माता व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष विनायक घोडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. खजिनदार रामचंद्र तिगडी यांनी वार्षिक अहवाल प्रस्तुत केला. पांडुरंग नायक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
स्वाती घोडेकर यांची प्रांत अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने त्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला. दहावी परिक्षेमध्ये शहरात सर्वप्रथम आलेल्या इंग्रजी माध्यमात केएलएस स्कूलची गौरवी नायक (९९.३८%), कन्नड माध्यमात संगमेश्वर कॉन्वेंट हायस्कूलची प्रियंका सुणगार (९७.६०%), मराठी माध्यमात ठळकवाडी हायस्कूलची गायत्री लोहार (९५.३६%) व गोमटेश हायस्कूलची श्रृति जाधव (९५.३६%), त्याचप्रमाणे बारावीत कला शाखेत लिंगराज काॅलेजची प्रियंका चिदंबर कुलकर्णी (९८.६६%), विज्ञान शाखेत आरएलएस् काॅलेजचा कृष्णा मुरकुटे (९८.५०%) आणि वाणिज्य शाखेत गोगटे काॅलेजची स्वरा कुलकर्णी (९८.५०%) यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन खास गौरविण्यात आले. सत्कारमूर्तिंनी मनोगते व्यक्त केली. यावेळी भारत विकास परिषद परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही विशेष पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
ज्येष्ठ सदस्या बना कौजलगी यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी एम्. जी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास डाॅ. जे. जी. नाईक, सुहास गुर्जर, नामाजी देशपांडे, सुहास सांगलीकर, सुभाष मिराशी, कुमार पाटील, जयंत जोशी, पी. जे. घाडी, योगेश कोळी, अरूणा नाईक, जया नायक, लक्ष्मी तिगडी, शुभांगी मिराशी, प्रिया पाटील, स्मिता भुजगुरव, पूजा पाटील आदि उपस्थित होते. अक्षता मोरे यांच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
Belgaum Varta Belgaum Varta