Wednesday , December 10 2025
Breaking News

भाजप नेत्यांना काम नाही, पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या : मंत्री जारकीहोळी

Spread the love

 

बेळगाव : सत्तेच्या 4 वर्षात भाजपवाल्याना काहीच विकास करता आला नाही. आता आम्ही सत्तेवर आल्यावर ते प्रत्येक गोष्टीला विरोध करत आंदोलनाची भाषा करत आहेत. त्यांना आता काहीच काम उरलेले नाही. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या अशी उपहासात्मक टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली.

बेळगावातील आपल्या निवासस्थानी रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी भाजपवर सडकून टीका केली. प्रारंभी ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना आदरांजली वाहून ते म्हणाले की, सरकारने मृतांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई दिली तर बरे होईल. काँग्रेसने गोहत्या बंदी कायदा रद्द केल्यास आंदोलन करण्याच्या भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर बोलताना, जाती-धर्मात भांडणे लावत बसणाऱ्या भाजप नेत्यांना आता काही काम उरलेले नाही. सत्ताकाळात विकास करता आला नाही, आता आंदोलनाची भाषा करताहेत. पुढील 5 वर्षे त्यांना आंदोलनच करत बसू द्या अशी खिल्ली उडवली. अशा मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सदन आहे. तेथे मुद्देसूद चर्चा करण्याचा अधिकार त्यांना आहे. चर्चेने मुद्दे पटवून देता येतात. सरकार योग्य निर्णय घेते. ते सोडून प्रसिद्धीसाठी सदनाबाहेर अशी ओरड करण्यात काही अर्थ नाही अशी टीका त्यांनी केली.
काँग्रेसने देऊ केलेल्या गॅरंटीच्या अमलबजावणीमुळे पूर्वीच्या सरकारची विकासकामे ठप्प होणार का? नवी विकासकामे राबवण्यात अडचण येणार नाही का? या प्रश्नावर मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, सध्या सुरु असलेल्या, घोषणा केलेल्या विकासकामांचा सरकार आढावा घेईल, अनावश्यक कामे थांबविण्यात येतील. लोकांच्या फायद्याची ठरणारी कामे सुरु ठेवण्यात येतील. गॅरंटी देऊनदेखील राज्यात काँग्रेस सरकार विकासकामांत खंड पडू देणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. बेळगावातील येळ्ळूर ते हुदलीपर्यंतच्या बळ्ळारी नाल्याला दर पावसाळ्यात पूर येऊन हजारो एकर शेती पाण्याखाली बुडून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या मुद्याकडे लक्ष वेधले असता, शेतकऱ्यांची समस्या माझ्या ध्यानात आहे. तेथे पुन्हा एकदा भेट देऊन पाहणी करणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून ही समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जारकीहोळी यांनी सांगितले. बेळगाव जिल्हा इस्पितळ आवारातील सुपरस्पेशालिटी इस्पितळाची पायाभरणी काँग्रेसच्या काळातच, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. शरणुप्रकाश यांच्याहस्ते करण्यात आली होती. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आम्हीच त्याचे उदघाटन करू असे त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 20 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे असे सांगून त्यात आम्हाला नक्की यश मिळेल असा विश्वास मंत्री जारकीहोळी यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत आमच्या गॅरंटीवर विश्वास ठेवून भाजपला कंटाळलेल्या जनतेने काँग्रेसला एवढे भरघोस यश दिले आहे. आता आम्ही गॅरंटीची अंमलबजावणीही सुरु केली आहे. त्यामुळे लोकसभेच्या 20 जागा जिंकण्यासाठी जनता काँग्रेसला नक्की आशीर्वाद देईल असे ते म्हणाले. बेळगावहून सुरु असलेली विमानसेवा बंद झाल्याकडे आणि बेळगावहून सुरु व्हायची वंदे भारत ट्रेन धारवाडहून सुरु होणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना, भाजप सरकार आणि मंत्र्यांनीच विमानसेवा बंद पाडली, आता ट्रेनही पळवत आहेत. वंदे भारत ट्रेन किमान बेळगावहून मुंबईपर्यंत तरी सुरु झाली पाहिजे. याबाबत उच्चस्तरीय बैठकीत चर्चा करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वादासंदर्भात बेळगाव बिशप यांनी घेतली मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची भेट

Spread the love  बेळगाव : गदग जिल्ह्यातील गजेन्द्रगड येथील होली फॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *