Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव जिल्ह्याच्या विकासाला गती द्या : पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची सूचना

Spread the love

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध प्रकल्पांबाबत प्रगती आढावा बैठक

बेळगाव : रेल्वे, पाटबंधारे, महामार्ग, रिंग रोड उड्डाणपूल बांधकाम, भूसंपादन पुनर्वसन आदी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित प्रत्येक प्रकल्पाच्या अंमलबजावणी प्रक्रियेला गती द्यावी, या प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक समस्या प्राधान्याने सोडवाव्यात, अशा सूचना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या.

आज मंगळवार १३ जून रोजी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या भूसंपादन, रेल्वे, राष्ट्रीय महामार्गासह विविध प्रकल्पांबाबत प्रगती आढावा बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. बेळगाव शहरातील रिंगरोड रेल्वे प्रकल्पासह महत्त्वाच्या प्रकल्पांवर सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान भूसंपादन किंवा त्यावर असलेली न्यायालयीन स्थगिती यासारख्या तांत्रिक मुद्द्यांना त्यांनी प्राधान्य दिले. तसेच या समस्या वेळीच सोडवून कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत असेही ते म्हणाले.

कमलापूर गावच्या स्थलांतरासाठी ७२ एकर जमीन आवश्यक आहे. मात्र गावकऱ्यांनी गावालगतच्या ठिकाणी जाण्याची विनंती केल्याने अधिकाऱ्यांनी याबाबत बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.

पूरग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या गावांचे स्थलांतर किंवा पुनर्वसन करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया जलद करावी. न्यायालयात काही प्रकरणे किंवा अडथळे असतील तर ते त्वरित सोडवण्याचे निर्देशही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. पुनर्वसनासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचनाही त्यांनी केली.

ग्रामस्थांची मते आणि न्यायालयाचा आदेश लक्षात घेऊन चिक्कोडी नजीक जगनूरसह पाच गावांच्या स्थलांतरासाठी योग्य तो प्रस्ताव तयार करण्यात यावा,असे त्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले. आधीच पुनर्वसन केंद्राचे भूखंड तयार करण्यात आले आहेत. स्थानिक आमदाराच्या नेतृत्वाखाली अथणी तालुक्याने संबंधित ग्रामस्थांना तातडीने वाटप करावे, ग्रामस्थांना पुनर्वसन केंद्रात स्थलांतरित करताना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

कडोली, होनगा, बेनकनहळळी, अगसगा ही छोटी गावी आहेत. बेळगाव रिंगरोडच्या बांधकामासाठी शेकडो एकर जमीन संपादित केल्यास ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांची मते एकूण रचनेत काही बदल करायला हवेत. परिसरात पर्यायी जागा शोधून काढावी आणि हलगा-मच्छे बायपासचे काम मार्गी लावण्यासाठी प्रलंबित भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी. अशा सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि भूसंपादन अधिकाऱ्यांना दिल्या.

शहरातील पहिले व दुसरे गेट उड्डाणपूल बांधकामाच्या निविदा तातडीने मागवाव्यात. त्यापूर्वी महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करून आराखडा निश्चित करण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.

रेल्वे विभागाचे ओव्हर ब्रिज व अंडरग्राउंड रस्ते अशास्त्रीय पद्धतीचे असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे आगामी काळात कोणताही ओव्हर ब्रिज किंवा अंडर ग्राउंड रस्ता बांधताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच आराखडा निश्चित करावा असा सल्ला मंत्र्यांनी दिला. बेळगाव शहरातील विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात बहुमजली इमारतींचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी सूचना त्यांनी केली.

अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी अशोक सर्कल ते राष्ट्रीय महामार्ग जंक्शन येथील संकम हॉटेल ते किल्ला या मार्गानजीक उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित फ्लायओव्हर (उड्डाणपूल) बांधकाम प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. चौकासह शहरातील प्रवेश मार्गावरील वाहतुकीचे व्यवस्थापन करणे हा उड्डाणपुलाचा मुख्य उद्देश आहे. त्याच पद्धतीने त्याची रचना करावी असे निर्देश मंत्री जानकीहोळी यांनी दिले. त्याचप्रमाणे पिरनवाडी पर्यंतच्या विस्ताराचा आढावा असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवू नये याकरिता काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

सोशल मीडिया अर्थात (समाज माध्यमांवर) खोट्या बातम्या किंवा चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर बारकाईने नजर ठेवावी. असे प्रकार आढळून आल्यास पोलीस विभागाने संबंधितांवर त्वरित गुन्हा नोंदवावा. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग (युनिट) स्थापन करावेत अशा सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस प्रमुखांना दिल्या. सुरक्षेच्या कारणास्तव शहरातील व महामार्गावरील व्यावसायिक केंद्रांवर हे युनिट बसविण्याबाबत पावले उचलावीत असे त्यांनी सांगितले.

बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ उर्फ (राजू) सेठ यांनी तहसीलदार कार्यालय जीर्ण असल्याने नव्याने बांधकाम करताना बहुमजली इमारत बांधण्यास प्राधान्य देण्याची मागणी केली.

काही प्रलंबित कामे असल्यास पूरग्रस्त म्हणून घोषित केलेल्या संबंधित जिल्ह्यातील गावांचे पुनर्वसन करण्यासाठी पाटबंधारे व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाशी तात्काळ समन्वय साधून पुनर्वसन प्रक्रियेला गती द्यावी, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. रिंगरोडच्या बांधकामानंतर बेळगाव शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल. दिवसेंदिवस वाहतुकीत वाढ होत असल्याने पिरनवाडी नजीक उड्डाणपूल अर्थात (फ्लायओव्हर) बांधण्यात येईल असे त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

या बैठकीत जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चिक्कोडी, कागवाड, अथणी बायपास रस्त्यासह रिंगरोड प्रकल्पाबाबत ठोस कार्यवाही करण्यात यावी असे सांगितले.

या बैठकीला बेळगाव शहर पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्यासह रेल्वे, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर पाणीपुरवठा,राष्ट्रीय महामार्ग, भूसंपादन, महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

 

About Belgaum Varta

Check Also

पतीकडून पत्नी आणि कुटुंबियांचा पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

Spread the love  अथणी : पतीच्या घरी झालेल्या भांडणामुळे कंटाळून आपल्या गावी गेलेल्या पत्नी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *