बेळगाव : उचगाव ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी असणारा ३० महिन्याचा कालावधी (अडिच वर्षे) पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या टप्प्यातील अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार या पदासाठी सोमवार दि. ३१ जुलै रोजी निवडणूक होणार असून इच्छुक ग्रामपंचायत सदस्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे..
उचगाव ग्रामपंचायतचे अध्यक्षपद हे महिला सर्वसामान्य असून उपाध्यक्ष पुरुष सर्वसामान्य सदस्यासाठी जाहीर करण्यात आले आहे. उचगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये उचगाव, बसुर्ते व कोनेवाडी अशी एकूण तीन गावे येतात. या गावातून एकूण २१ सदस्यसंख्या आहे. या निवडणुकीसाठी चार महिला – अध्यक्षपदासाठी तर दोन उमेदवार उपाध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे समजते. सध्या दोन गटांमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची रस्सीखेच सुरू आहे. इतर सदस्यांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न चालविले आहेत. याबरोबरच वेगवेगळी आमिषेही दाखविली जात आहेत. मागच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत समान सदस्यसंख्या झाल्याने टॉसवर अध्यक्ष-उपाध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र यावेळी काय घडणार, याकडे आता ग्रामस्थ व जनतेचेही लक्ष लागून राहिले आहे..
सध्या या ग्रामपंचायतमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी दोन गट कार्यरत असून १० आणि ११ अशाप्रकारचे बलाबल आहे. मात्र निवडणुकीच्यावेळी यामध्ये कोणता उमेदवार कोणाकडे जाणार यावर अध्यक्ष, उपाध्यक्षपद कोणत्या गटाला आणि कोणाला मिळणार, हे अवलंबून आहे. ग्रामस्थांच्या मते २१ सदस्यांनी एकत्र येऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड बिनविरोध करून गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन, एकजुटीने काम करून गावातील समस्या सोडवाव्यात आणि गावचा विकास करावा, अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta