Wednesday , December 10 2025
Breaking News

शाळा बसचालकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन!

Spread the love

 

बेळगाव : विद्यार्थिनींची गैरवर्तन करणाऱ्या शाळा बसचालकाबद्दल विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेला कल्पना देऊनसुद्धा त्यावर कारवाई न झाल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या शाळेत जाऊन व्यवस्थापनाला धारेवर धरले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व माध्यमिकच्या प्राचार्यांनी बरीच सारवासारव केली. परंतु, नंतर मात्र, त्या बसचालकाला आपण निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू, असे स्पष्टीकरण दिले. तथापि, अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या या चालकाचे दुष्कृत्य पोक्सो कायद्याचे उल्लंघन करणारे असून त्याच्याविरोधात पोलीस स्थानकामध्ये रितसर तक्रार नोंदविण्याचा आग्रह पत्रकारांनी धरला. तेव्हा आपण तक्रार निश्चित करू असे आश्वासन देण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, सावगाव रस्त्यावर आध्यात्मिक गुरुच्या नावाने सीबीएसई माध्यमाची शाळा चालविली जाते. ही शाळा शहरापासून दूर असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळेने खासगी बसची सुविधा ठेवली आहे. या बसमध्ये असणारा चालक हा बस अत्यंत वेगाने चालवितो. वेळेत येत नाही किंवा वेळेवर विद्यार्थ्यांना सोडत नाही, अशाही तक्रारी त्याच्याबद्दल होत्या. मात्र, सहा महिन्यांपूर्वी एक विद्यार्थिनी या चालकाच्या गैरवर्तनाची शिकार ठरली. तिने स्वतःला सोडवून घेतले आणि मुख्याध्यापिकेला याबाबत कल्पना दिली. मात्र, मुख्याध्यापिकेने तू ही बाब कोणालाही सांगू नकोस, घरी पालकांना याबाबत बोलू नकोस, असे त्या विद्यार्थिनीलाच दटावले.
दरम्यान, सदर विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणींना याबद्दल कल्पना दिली. तेव्हा त्यातील एका विद्यार्थिनीने आपल्या आईकडे हा सर्व तपशील पुरवला. त्यानंतर सदर महिलेने ही बाब अतिशय गंभीर असल्याचे लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापिका व प्राचार्यांशी संपर्क साधला. तेव्हा आम्हाला गुरुवारीच याबाबत माहिती मिळाली आहे आणि आम्ही त्या चालकाला निलंबित केले आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
मात्र, सदर प्रकार अनेकदा घडले असून मुख्याध्यापिका व प्राचार्य त्याबद्दल सारवासारव करत असल्याचे लक्षात येताच सदर महिलेने सोमवारी सर्व माध्यम प्रतिनिधींसह शाळा गाठली. त्यावेळी पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करताच योग्य उत्तरे देण्यास असमर्थता दर्शविली. एका महिला पत्रकाराने सदर मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडून सर्व ती विचारणा करताच त्या विद्यार्थिनीने जे काही झाले, ते सर्व सांगितले. याशिवाय अनेक विद्यार्थिनी या चालकाच्या गैरवर्तनाला बळी पडल्या तरी त्या भीतीने बोलू शकत नसल्याचे सदर विद्यार्थिनीने स्पष्ट केले.
चालकाचे हे वर्तन गुन्हा ठरतो आहे, तरीही आपण पोलीस स्थानकात तक्रार का केली नाही? उद्या हा चालक आणखी कोणत्या तरी शाळेत जाऊन याच प्रकारची पुनरावृत्ती करेल, हे लक्षात आणून देऊन त्यासाठीच पोलीस स्थानकात तक्रार आवश्यक आहे, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांनी दबाव आणताच आपण पोलीस स्थानकात आता तक्रार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

About Belgaum Varta

Check Also

भोवी-वडर समाजाच्या विकासासाठी बेळगावात आज नेते मंडळींचे मार्गदर्शन

Spread the love  निपाणी (वार्ता) : भोवी-वडर समाज विकास निगममधून समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *