बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, जेणेकरून भविष्यात कोणीही असे कृत्य करण्यास धजावू नये अशी मागणी करत संतप्त पिरनवाडी ग्रामस्थांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. जोरदार निदर्शने करून अरबाजला न्याय द्या अशी एकमुखी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना अरबाजची आजी आणि अन महिलांनी सांगितले की, अरबाज कधी कोणाच्या भानगडीत पडत नसे. आरोपी त्याचे मित्र नाहीत. जुजबी ओळखीतून आरोपींनी त्याला हत्येच्या दिवशी वाढदिवसाची पार्टी करू चल असे सांगत घरातून बोलावून नेले आणि त्याचा विनाकारण निर्घृण खून केला आहे. सरळ स्वभावाच्या अरबाजचा असा निर्घृण खून केल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यापुढे कोणीही असे कृत्य करण्यास धजावू नये यासाठी आरोपींना जन्मठेप नव्हे तर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना स्थानिक नेते प्रमोद पाटील यांनी सांगितले की, अरबाज सुस्वभावी होता. त्याचे कोणाशीही भांडण नव्हते. त्याला फसवून घरातून बोलावून नेऊन खून करण्यात आला आहे. त्याच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. अरबाज वृद्ध आजीजवळ रहात होता. लाकडाच्या अड्ड्यात काम करून घर चालवायचा. त्याच्या मृत्यूमुळे त्याची आजी एकटी पडली आहे. तिला पेन्शनही मिळत नाही. त्यामुळे सरकारने तिला तातडीने घर आणि पेन्शन मंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांची आरोपींना २४ तासांत पकडून चांगले काम केले आहे. पिरनवाडी हे शांत गाव आहे. तेथील शांतता बिघडवण्यासाठी कोणी या प्रकरणाला वेगळा रंग देऊ नये यासाठी आम्ही गावात शांततासभा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित मोर्चेकऱ्यांनी ‘अरबाजला न्याय मिळालाच पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा व निदर्शनात महिलांची संख्या लक्षणीय होती.
Belgaum Varta Belgaum Varta