Monday , December 8 2025
Breaking News

4 लाख रू. किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा जप्त!

Spread the love

 

बेळगाव : शहरातील सीसीबी पोलिसांनी काल गुरुवारी सदाशिवनगर येथील वीरूपाक्षी रेसिडेन्सी या अपार्टमेंटमध्ये धाड टाकून तब्बल 4 लाख रुपये किमतीचा बेकायदेशीर बनावट दारू साठा व इतर साहित्य जप्त केले असून याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. हसन साहेब बेपारी (वय 22, रा. उज्वलनगर, बेळगाव) आणि राजेश केशव नायक (वय 41, रा. विजयनगर, हिंडलगा बेळगाव) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी विभागाचे पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उपरोक्त कारवाई केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपरोक्त दोन्ही आरोपी उंची दारूच्या रिकाम्या बाटल्या गोळा करत होते. त्यानंतर गोवा आणि कर्नाटक राज्यात तयार होणाऱ्या अत्यंत कमी किमतीच्या दारूवर रासायनिक प्रक्रिया करून बनावट उंची दारू तयार करत होते. ही दारू ते आपल्याकडील रिकाम्या बाटल्यांमध्ये भरून त्यावर दारूच्या विविध उंची ब्रँडचे लेबल लावून बाटल्या पॅक करत होते. तसेच त्याच ब्रँडच्या बॉक्समध्ये त्या बनावट दारूच्या बाटल्या भरून त्यांची विक्री करत होते. मूळ कंपनी आणि सरकारच्या अनुमतीविना परवाना नसताना या पद्धतीने बनावट दारूतून ते मोठी कमाई करत होते. हा प्रकार जनतेची आणि सरकारची फसवणूक करणारा असल्यामुळे शहर सीसीबी पोलिसांनी धाड टाकून आरोपींसह मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी जप्त केलेल्या 4 लाख रुपयांच्या मुद्देमालामध्ये 100 पायपर्स, ब्लेंडर्स प्राईड, व्हॅट -69, ब्लॅक अँड व्हाईट, रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, मॅजिक मोमेंट्स, स्मिर्नोफ, मॅकडोवेल्स, बकार्डी ओल्ड मॉंक, रियल -7, इम्पिरियल ब्लू, डीएसपी ब्लॅक, ब्लॅक डॉग, टीचर्स कंपनी या ब्रँडच्या व्हिस्की, रम, होडका या बनावट दारूंच्या 750 एमएलच्या 439 बाटल्या. ओरिजनल चॉईस दारूच्या 375 एमएलच्या 20 बाटल्या, ओल्ड टावरीन दारूचे 180 एमएलचे दोन टेट्रा पॅक, दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी इंडिका कार, 21,500 रुपये किमतीचे चार मोबाईल फोन आणि रोख 17,500 रुपयांचा समावेश आहे.

या प्रकरणातील जावेद बेपारी व नागेश असे आणखी दोन आरोपी फरारी असून लवकरच त्यांनाही गजाआड केले जाईल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

About Belgaum Varta

Check Also

कर्नाटक दडपशाहीला जुगारून प्रशासकीय जागेत महामेळावा यशस्वी

Spread the love  बेळगाव : पहाटेपासून अटकसत्र सुरू करून महामेळावा उधळून लावण्याचे कर्नाटकी प्रयत्न हाणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *