बेळगाव : वडगाव, जुने बेळगाव, शहापूर तसेच परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला जनावरांचा दवाखाना चावडी येथे मनपाच्या जागेत अनेक वर्षापासून कार्यरत आहे. वडगाव चावडी येथील जनावरांचा दवाखाना हा परिसरातील शेतकरी व सर्वसामान्यांच्या सोयीचा झाला आहे. पण अलीकडे तेथील व्यवस्था पाहिल्यास जनावरांच्या दवाखान्यात विज नाही तसेच इतर सोयींचाही अभाव आहे. त्यामुळे इथे उपचार करण्यास डॉक्टरांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चावडी समोरच 24 तास पाण्याच्या टाकीचे काम सुरू असल्याने डॉक्टरांना तेथे येणाऱ्या जनावरांवर उपचार करणेही कठीण झाले आहे. समोरच चिखलाचे साम्राज्य साचल्यामुळे तेथे गेलेल्या नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे. तसेच चावडीची इमारत खूप जुनी असल्यामुळे ती धोकादायक स्थितीत आहे. असे कारण सांगत पशुवैद्यकीय खाते तेथील जनावरांचा दवाखाना दुसरीकडे हलविण्याच्या तयारीत आहेत. मात्र वडगाव, शहापूर, जुने बेळगाव परिसरातील शेतकऱ्यांना चावडी येथे दवाखाना असणे सोयीचे ठरणार आहे. या भागातील शेतकरी आपली जनावरे, श्वान, मांजरे, कोंबड्या आधी पाळीव प्राण्यांवर याच दवाखान्यात उपचार करण्यासाठी घेऊन येतात. त्यामुळे जनावरांचा दवाखाना चावडी येथेच ठेवल्यास या भागातील शेतकऱ्यांना व जनतेला सहकार्य होईल यासाठी मनपाने सदर जागा कायमस्वरूपी पशुसंवर्धन खात्याला दिली तर त्या ठिकाणी पशुसंवर्धन खाते अद्यावत वैद्यकीय दवाखाना बांधून देण्यास तयार आहे. तेव्हा राज्य सरकारने व मनपाने शेतकरी व सामान्य जनतेचा विचार करून वडगाव मधील जनावरांचा दवाखाना चावडी येथेच कायमस्वरूपी ठेवावा. इतरत्र कोठेही होऊ नये आणि हलविण्यासंदर्भात काही हालचाली झाल्यास येथील शेतकरी व जनतेतर्फे जनावरांसह उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचबरोबर बेळ्ळारी नाल्याचा प्रश्नही मार्गी लावत परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाची अतोनात हानी होत आहे. याचा गांभीर्याने विचार करण्यासाठी सर्व शेतकरी बंधू व जनतेची महत्त्वाची बैठक वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिर राजवाडा कंपाऊंड येथे उद्या रविवार दि. 13 रोजी सकाळी 10.30 वाजता बोलवण्यात आली आहे. त्यासाठी परिसरातील शेतकरी व जनतेने मोठ्या संख्येने बैठकीत हजर राहून पुढील रणनीती ठरविली जाणार आहे, असे शेतकरी संघटनेचे वडगाव विभागाचे अध्यक्ष अमोल देसाई व रयत संघटना तालुका अध्यक्ष राजू मर्वे यांनी कळविले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta