बेळगाव : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहराच्या दक्षिण भागात तथाकथित विकासकामांचा सपाटा लावण्यात आला होता पण हा विकास पहिल्या पावसातच वाहून गेल्यामुळे कंत्राटदारावर पुन्हा एकदा डांबरीकरण करण्याची वेळ आली आहे.
अनगोळ- वडगाव रस्त्याची मागील आठ वर्षांपासून दुरवस्था झाली होती. मागील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनगोळ- वडगाव रोडसह दक्षिण मतदारसंघातील अनेक रस्ते करण्यात आले होते. मात्र या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ठ दर्जाचे केल्यामुळे अवघ्या तीन महिन्यात रस्ते खचल्याने पुन्हा रस्त्याची डागडुजी करण्याचा प्रकार सध्या शहराच्या दक्षिण भागात पाहायला मिळत आहे.
मतदारांना विकासाचे गाजर दाखविण्यासाठी दक्षिण आमदारांनी तथाकथित “डेव्हलपमेंट”च्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम केले आहे. रस्त्याच्या कामाची बिले मंजूर करून घेण्यासाठी खचलेल्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींच्या 40% कमिशनची पूर्तता करता करता कंत्राटदारावर दुबार रस्ता डागडुजीची नामुष्की ओढवली आहे की काय अशी चर्चा शहरात होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta