रुद्रकेसरी मठाच्या हरिगुरु महाराजांचे सरकारवर टीकास्त्र : पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
बेळगाव : सुतगट्टी येथील मुनियप्पा काडसिद्धेश्वर महाराजांचा बेळगावला येताना भीषण अपघात झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले तर त्यांच्या सोबतच्या दोन शिष्यांचा दुर्दैवी अंत झाला. भीषण अपघात होऊनही स्वामीजी तसेच त्यांच्या शिष्यांना अद्याप आर्थिक मदत देण्यात आलेली नाही. हिंदुत्व व गोरक्षणासाठी काम करणाऱ्या साधू संतांना जर ही वागणूक मिळत असेल तर याचा आम्ही निषेध करतो. मृत्यू पावलेल्या शिष्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा रुद्रकेसरी मठाचे स्वामीजी हरिगुरु महाराज यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी मठांमध्ये जाऊन मते मिळविण्यासाठी स्वामीजींच्या चरणी लीन होतात. परंतु निवडणुकानंतर मात्र स्वामीजी तसेच त्यांच्या मठाकडे लक्ष देण्यासही त्यांना वेळ नसतो. काँग्रेस सरकारने सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासने व सध्या ते करत असलेले काम यामध्ये दुटप्पीपणा जाणवतो. गोहत्या, धर्मांतर व पाठ्यपुस्तकांच्या वादामध्ये हे सरकार गुरफटत आहे. इतर धर्मियांना आर्थिक मदत करण्यास अग्रेसर असणाऱ्या या सरकारने हिंदू साधूसंत व मठांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्वामीजींनी केला.
गोरक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या काडसिद्धेश्वर महाराजांचा मोठा भक्त परिवार आहे. त्यांच्या अपघातानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. परंतु ज्या भाविकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे हे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे. भरकटलेल्या समाजाला योग्य दिशा देण्याचे काम साधूसंत आपापल्या मार्गाने करत असतात. त्यामुळे राज्य सरकारने हिंदू मठांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली.
गंगाधर स्वामीजी यांनी सरकारवर टीका करत मृत्यू पावलेल्या पांडुरंग जाधव, पंचाक्षरी हिरेमठ यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. दोन महिने उलटले तरी कोणत्याही आमदार, खासदार अथवा लोकप्रतिनिधींनी स्वामीजींची भेटदेखील घेतली नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बेळगाव परिसरातील विविध मठाचे स्वामीजी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta