बेळगाव : काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर विविध योजना लागू केल्या आहेत. याचबरोबर महत्त्वाकांक्षी असणाऱ्या उद्योग खात्री योजनेतील सामग्रीचेही वितरण करण्याचे नियोजन केले आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यभरातील सामग्री निधी वितरित करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. दरम्यान, उद्योग खात्री योजनेतील सामग्रीसाठी जिल्ह्यात तब्बल ८२ कोटींचा निधी वितरित करण्यात येणार आहे.
मागील आठ महिन्यांपासून हा निधी वितरित करण्यात आला नव्हता. त्यामुळे ज्या कंत्राटदारांनी यामध्ये पैसे गुंतविले होते. त्यांचा निधी तसाच पडून होता. कामे पूर्ण झाली असली तरी निधी आला नसल्याने अनेक कंत्राटदारांचे जगणे कठीण झाले होते. याचबरोबर काहींनी तर कंत्राटदारांकडे ४० टक्के कमिशनची अटही केली. दरम्यान, भाजप सत्तेवर असताना अशी मागणी होत होती. तर आता काँग्रेस सत्तेत आल्यानंतरही तशीच अवस्था झाल्याचे काहींनी सांगितले. दरम्यान निधी मंजूर झाला असून २ सप्टेंबर रोजी त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
वर्षातून दोन ते तीन वेळाच हा निधी वितरित केला जातो. त्यामुळे कमिशन दिले तरी चालेल पण विकासकामांमध्ये अडकून पडलेला निधी मिळविण्यासाठी आता धडपड सुरू आहे. ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष, पीडीओ यांच्यासह आता तालुका पंचायत कार्यालयातील अधिकारीही कमिशनसाठी धडपडू लागले आहेत.
दरम्यान अनेक कंत्राटदार तर मागील दोन ते तीन वर्षांपासून कामे करूनही गप्प बसण्यातच धन्यता मानत आहेत. कारण काही तरी कारणे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्यातच ग्राम पंचायत अध्यक्ष धन्यता मानत असल्याचे दिसून येत आहे. तर याला अधिकारीही सहभागी असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे यावेळी तरी आपले पैसे मिळतील, अशाच आशा सध्या लागून राहिली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta