Monday , December 15 2025
Breaking News

व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक

Spread the love

 

बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील एका व्यापाऱ्याच्या अपहरणात फरारी झालेल्या विशालसिंग चव्हाणला सीसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. अपहरणाच्या घटनेनंतर तब्बल तीन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली असून तो वारंवार पोलिसांना चकवत होता. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 25, रा. शास्त्रीनगर, बेळगाव शहर) याला अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

याच प्रकरणात दोन दिवसांपूर्वी त्याचा साथीदार महादेव सोलापुरे (वय 28) याला अटक करण्यात आली आहे. 1 जून 2023 रोजी सर्वोदय मार्ग हिंदवाडी येथील शशिकांत शंकरगौडा (वय 50) या व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी विशालसिंग चव्हाण, विनायक उर्फ विल्लक प्रधान (रा. महाद्वार रोड) यांच्यासह तिघा जणांवर टिळकवाडी पोलीस स्थानकात 12 जून रोजी एफआयआर दाखल करण्यात आले होते. हनुमाननगर येथे 5 गुंठे जागा बघायची आहे, असे सांगत शशिकांत यांना त्यांच्याच कारमधून नेवून त्यांचे अपहरण केले होते. बॉक्साईट रोडवरून हुक्केरीला नेवून एका घरात कोंडून ठेवले. 10 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. खंडणी दिली नाही तर संपवून टाकू, असे धमकावण्यात आले होते.

शशिकांत यांनी आपल्याजवळ इतके पैसे नाहीत, असे सांगितल्यानंतर शेवटी 3 लाखाला व्यवहार ठरविण्यात आला. 75000 रुपये रोकड घेऊन उर्वरित 2 लाख रुपयांसाठी शशिकांत यांची कार ठेवून घेण्यात आली होती. या घटनेनंतर विशालसिंग व त्याचे साथीदार फरारी होते. दोन ते अडीच महिन्यांनंतरही आरोपींना अटक करण्यात आले नाही म्हणून पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण सीसीबीकडे सोपविले होते.
सीसीबीचे पोलीस निरीक्षक नंदिश कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशालसिंगला अटक केली आहे. खुनी हल्ला, खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर तो न्यायालयातही हजर झाला नव्हता. फरारी असताना बेळगाव परिसरातच साथीदारांसह त्याचा वावर होता. रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबोमण्णावर (वय 29, मूळचे रा. हलगा-बस्तवाड, सध्या रा. भवानीनगर) याच्या खून प्रकरणातही विशालसिंग संशयित आरोपी आहे. 21 जून 2022 रोजी गोळीबार करून त्याला अटक करण्यात आली होती. गोळीबारात तो जखमी झाला होता. वीरभद्रनगर सर्कलजवळ ही घटना घडली होती. त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने व्यापाऱ्याचे अपहरण केले होते.

About Belgaum Varta

Check Also

आईच्या बाराव्या दिवशी जपली सायनेकर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी!

Spread the love  बेळगाव : आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून अनेकजण परोपकार करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *