बेळगाव : वडगाव-यरमाळ रस्त्यावर रात्रीच्यावेळी तळीराम तळ ठोकून बसल्याचे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. दररोज रात्री अंधाराचा फायदा घेत रस्त्यावर घोळका करून दारू पित बसलेले दिसत आहेत. काही वेळेस मद्यपानासोबत जुगाराचे डाव देखील रंगत आहेत. या मद्यपींचा त्रास या परिसरातील शेतकरी तसेच महिलांना सहन करावा लागत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे हे प्रकार वाढत चालले आहेत.
वडगाव भागातील बहुतांश लोकांची शेती ही यरमाळ रस्त्यालगत आहे. शेतकरी शेतात भाजीपाला, ऊस, भात आदी पिके घेत असतात. शेतीकामासाठी शेतकरी रात्री उशिरापर्यंत शेतात काम करत असतात. रात्रीच्या अंधारात मद्यपी दारू पिऊन शेतात बाटल्या फोडून टाकत आहेत. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त घालणे बंद केल्यामुळे मद्यपी आणि जुगाऱ्यांचे फावले आहे. यरमाळ रस्त्यावरून वडगाव परिसरातील शेतकऱ्यांसोबत अवचारहट्टी, यरमाळ, देवगहट्टी,
के.के. कोप आदी भागातील लोकांची ये-जा असते. रात्रीच्या अंधारात सदर रस्त्यावर मद्यपींचा हैदोस असल्यामुळे नागरिकांना विशेषतः महिलांना या मार्गावरून ये-जा करणे कठीण बनत चालले आहे. तसेच वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta