बेळगाव (वार्ता) : बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीने गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या बांधकामामुळे जमिनी गमावलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळावा. याबाबत कर्नाटक राज्य हरित सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील बेक्कीनकेरी ग्रामपंचायतीच्या अतिवाड गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून तलाव बांधल्यामुळे ज्यांची जमीन गेली त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. 15 वर्षापासून कोणताही मोबदला अथवा पर्याय देण्यात आलेला नाही. संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांनी याबाबत लक्ष घालावे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी. भूसंपादन कायद्यांतर्गत चालू बाजार दर सर्वेक्षणाच्या आधारे शेतकऱ्यांना पर्याय व उपाय उपलब्ध करून द्यावेत. ज्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची नोंदणी केली आहे. त्यांच्या बँक खात्यावर थेट डीबीएसह नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश रामा नायक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.