शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : कर्नाटक प्रशासनाने काळ्या दिनाला परवानगी नाकारली असली तरीही काळादिन गांभीर्याने पाळणार आणि सायकल फेरी यशस्वी करणारच असा निर्णय शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
काळ्यादिनाबाबत विचारविनिमय करण्यासाठी शहर समिती कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक मराठा मंदिरमध्ये झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर होते.
काळ्यादिनासाठी प्रशासनाने परवानगी दिली नसली तरी देखील गांभीर्याने पाळण्यात येईलच तसेच मूक मोर्चा देखील यशस्वी करण्यात येणार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला तरी देखील काळ्यादिनी निषेध फेरी ही निघणारच. एक दिवस आधी स्थळ आणि वेळ कळविण्यात येईल, असे मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले.
संघटना बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात यावे, तरुणांना कार्यकारिणीमध्ये सामावून घेण्यात यावं, त्याचबरोबर शहर समितीकडून मध्यवर्ती समितीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच महाराष्ट्र सरकारकडे सीमाप्रश्नी पाठ पुरावा करण्यासाठी नवीन लोकांना संधी देण्यात यावी, युवकांना संघटनेत नवीन पदे निर्माण करण्यात यावीत, अशा अनेक मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
बैठकीत ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण -पाटील, मदन बामणे, महादेव पाटील, सागर पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, प्रशांत भातकांडे, रणजित हावळानाचे, माजी नगरसेवक राजू बिर्जे, राकेश पलंगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत दादा कोंडुसकर, कपिल भोसले, शिवराज पाटील, नेताजी जाधव, बाबू कोले, चंद्रकांत कोंडुसकर, उमेश पाटील, अनिल अमरोळे, अंकुश केसरकर, राजकुमार बोकडे, किरण हुद्दार, धनंजय पाटील, श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे व कार्यकर्ते उपस्थित होते.