बेळगाव : ’भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज आहे’, असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले. बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
’प्रादेशिक अस्मिता आणि अल्पसंख्याक अधिकारांची गरज असणार्या राज्यांतील खासदारांना एकत्र करू’ आणि हा विषय केवळ महाराष्ट्राचा नसून देशातील विविध राज्यांचा आहे हे केंद्राला पटवून देण्याची गरज आहे, असेही माने यांनी म्हटलं आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर बेळगावात झालेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेनेचे आम्ही सर्व खासदार संसदेमध्ये निषेध नोंदवणार आहोत. त्या संतापजनक घटनेचे पडसाद संसदेमध्ये आज निश्चितपणे उमटणार आहे अशीही ग्वाही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.
नवी दिल्ली येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी सकाळी महाराष्ट्रातील तीन नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी दीपक दळवी यांच्यावरील भ्याड हल्ला, भाषिक अल्पसंख्यांक कार्यालयाचे स्थलांतर, मराठी भाषिकांचे खच्चीकरण आदी माहिती समितीच्या युवकांनी खासदार धैर्यशील माने यांच्या भेटीप्रसंगी त्यांच्या कानावर घातली असता खासदार माने यांनी उपरोक्त माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि चळवळीच्या रुपाने कर्नाटकात असणारा सीमाभाग महाराष्ट्रमध्ये येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे एक ज्येष्ठ नेतृत्व सन्माननीय दिपक दळवी यांच्यावर कांही लोकांनी भ्याड हल्ला केला. या पद्धतीने महाराष्ट्राच्या अस्मितेला दुखावण्याचे काम केले गेले आहे. अत्यंत संयमाने मराठी भावना दुखावण्याचे काम करून सुद्धा आज देखील त्याविरोधात तेथील प्रशासन जसे हवे तशी कठोर भूमिका घेण्यात अपयशी ठरत आहे. खरं तर या बाबतीत कठोर भूमिका घेण्याची गरज आहे.
मात्र राज्य शासनाच्या वरदहस्ताखाली मराठी माणसाचा आवाज चचण्याचे, दडपण्याचे काम ही मंडळी करत आहेत. संसदेत आम्ही सर्वजण शिवसेनेच्यावतीने याचा निषेध नोंदवणार आहोत. त्याबरोबरच सीमाभागात असे प्रकार वारंवार घडत आहेत. ज्येष्ठ नागरिकांपासून तरुणांपर्यंत एक आक्रोशाचे वातावरण तेथील जनमानसात आहे असे सांगून यासाठी आज त्याचे पडसाद निश्चितपणे उमटतील, असे खासदार धैर्यशील माने यांनी स्पष्ट केले.