बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नसल्याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ एक उघडकीस येत आहेत. वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. ती विस्मरणात जाते न जाते तोच अंगणवाडी मदतनीस महिलेचे नाक कापून राक्षसी वर्तन केल्याची आणखी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.बेळगाव तालुक्यातील बसुर्ते गावात सुगंधा मोरे (५०) या अंगणवाडी मदतनीस महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुंगधावर सध्या उपचार सुरू असून ती जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत आहे. अंगणवाडीतील मुले शेजारच्या घराच्या आवारात उगवलेली फुले तोडत असल्याने अंगणवाडी मदतनीस महिलेला शिवीगाळ करून विळ्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. घराची मालकीण कल्याणी मोरे हिने हे कृत्य केले आहे.नाक कापल्यानंतर सुगंधाच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याने ही महिला जीवन-मरण यांच्यात संघर्ष करत आहे. बसुर्ते येथे अंगणवाडीतील मुले खेळत होती. त्यांनी अंगणवाडीशेजारील घराच्या आवारात उगवलेली फुले तोडली. त्यामुळे संतप्त झालेल्या घरमालकाने अंगणवाडी मदतनीसला मारहाण केली. मुलांनी अजाणतेपणी केलेल्या चुकीमुळे हेल्पर महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. १ जानेवारी रोजी अंगणवाडी केंद्रासमोर घडलेली घटना उशिरा उघडकीस आली. सध्या सुगंधा यांच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.