बेळगाव : दरवर्षी लाखो लोक भेट देणाऱ्या सौंदत्ती यल्लम्मा रेणुका मंदिर आणि यल्लम्मा डोंगराच्या सर्वांगीण विकासासाठी एक मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार असल्याचे परिवहन आणि मुजराई विभागाचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले.
मंत्री रामलिंगारेड्डी यांनी आज सोमवारी यल्लम्मा मंदिराला भेट दिली आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मंत्री रामलिंग रेड्डी म्हणाले, सौंदत्ती यल्लम्मा मंदिर हे उत्तर कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे आणि प्रत्येक वर्षी लाखो लोक येथे भेट देतात. देवी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो लोकांना सुरळीत दर्शन घेता यावे, तसेच यात्रे दरम्यान पुरेशी पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
चार ते पाच तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवारा, स्वच्छतागृह आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आराखडा तयार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.
मुजराई व पर्यटन विभागाच्या वतीने विकासकामे करण्याचा मानस आहे. उपलब्ध असलेल्या ८७ एकर जागेत पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करता येईल, असा सर्वंकष आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी सांगितले.