Thursday , December 11 2025
Breaking News

किशोरी विकास केंद्राचे काम मोठे : बेडेकर

Spread the love

 

बेळगाव : कष्टाळू म्हणजे महिलाच. घरची सर्व कामे करून, नोकरी करून संध्याकाळी पुन्हा कुटुंबाची भोजनादी व्यवस्था करणारी महिला, न थकता अहोरात्र काम करणारी महिला, सतत हसतमुख राहणारी महिला, अशा सर्व महिला मिळून किशोरींना प्रशिक्षण देण्याचे काम नि:स्वार्थपणे करीत आहेत. हे काम मोठे आहे, असे गौरवोद्गार बेळगाव अर्बन सौहार्द सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुणराव ज. बेडेकर यांनी काढले.
वडगाव येथील जागृती महिला स्वावलंबन केंद्रातर्फे जेल शाळा प्रांगणात रविवार दि. 4 रोजी ‘किशोरी संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर लघुउद्योग भारतीचे कर्नाटक प्रांत अध्यक्ष डॉ. सचिन सबनीस, विद्याविकास प्रकल्पाचे राज्य कार्यदर्शी राचय्या वारेकलमठ, बेंगळूर येथील अभ्युदय संस्थेचे संचालक लक्ष्मीनारायण, जागृती केंद्राच्या राज्य संचालिका शिल्पा वेर्णेकर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुमारे 500 विद्यार्थिनींनी भाग घेतला. त्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हनुमान चालिसा पठण, देशभक्तिपर गीते सादर केली. विविध स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
बेळगाव उपनगरात 28 ठिकाणी विद्यार्थिनी विकास केंद्रातर्फे गृहपाठ चालविण्यात येतात. यातील सर्व विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. भारतमाता प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्राचे कार्यदर्शी सतीश देशपांडे यांनी वार्षिक आढावा सादर केला. प्रमुख वक्ते लक्ष्मीनारायण म्हणाले, की आम्ही सर्व सिंहाचे सुपुत्र आहोत. कष्टाला न घाबरता विजयी व्हायचे आहे. दोन्ही हात नसतानाही धनुर्विद्येत सुवर्णपदकाला गवसणी घालणारी शीतलदेवी व वाचनालयात झाडलोट काम करणारी उमा आता तहसीलदार झाली आहे. यामागची त्यांची जिद्द आणि चिकाटी दिसून येते.
शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.


“फी देऊन 45 मिनिटे शिकवणीला जातात. आम्हाला दीड तास मोफत शिकवितात. शाळेत फळ्यावरील गणित सोडविणार्‍या आम्हीच. आमचे सर थक्क होतात. हे तुम्हाला कोणी शिकविले असे ते विचारतात. आमचे उत्तर असते किशोरी केंद्र. येथे प्रेमाने लाड करून आई आणि ताई शिकवितात. या विकास केंद्रात जायला आम्हाला फार आवडते.”
– श्रेया शंकर बेविनगिडद, (किशोरी केंद्र विद्यार्थिनी)

About Belgaum Varta

Check Also

मॉडेल मराठी शाळा येळ्ळूरमध्ये नूतन एसडीएमसी अध्यक्षपदी दिव्या कुंडेकर

Spread the love  स्मार्ट टीव्ही व तिजोरीचे उद्घाटन बेळगाव : येळ्ळूर येथील सरकारी मराठी मॉडेल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *