
कोल्हापूर : समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेतली.
गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची सीमाप्रश्नी कानउघाडणी करण्यात आल्यानंतर मागील आठवड्यात मुंबई मुक्कामी सीमासमन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी सीमाभागासाठी लवकरच तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्यात येईल, असे सूचित केले. यानंतर आज समिती नेत्यांचे शिष्टमंडळ कोल्हापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नेमण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यासंदर्भात लवकरच स्थानिक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नोडल अधिकारी नेमण्याचे काम सुरु करण्यात येईल. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सीमेवर असणाऱ्या शिनोळी ग्रामपंचायतीत येत्या आठवड्याभरात तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. यावेळी सीमावासीयांसाठी महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा, सीमाभागातील इतर समस्या आदींसंदर्भातही चर्चा करण्यात आली.
यावेळी रमाकांत कोंडुसकर, बेळगाव वारकरी संघाचे अध्यक्ष हभप शंकर बाबली, अनंत पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta