Friday , December 12 2025
Breaking News

भाषेच्या जडणघडणीत लेखक कवींची भूमिका महत्त्वाची : डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली

Spread the love

 

शब्दगंध कवी मंडळातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा

बेळगाव : भाषेला श्रीमंती मिळवून देण्याचे कार्य कवी करीत असतात. भाषेच्या जडणघडणीत लेखक कवींची भूमिका महत्त्वाची असते. मराठी भाषेला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. संतांनी, विचारवंतांनी, साहित्यिकांनी या परंपरेला घडवले आहे. असे असताना मराठी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात बंद पडू लागल्या आहेत. मराठी भाषा दिन साजरा करताना याची कारणे शोधणे आवश्यक आहेत. जोपर्यंत मराठी भाषेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत मराठी शाळांची अवस्था सुधारणार नाही असे प्रतिपादन डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली यांनी केले.

येथील शब्दगंध कवी मंडळातर्फे लोकमान्य ग्रंथालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून राणी चन्नमा विद्यापीठातील मराठी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. मैजुद्दीन मुतवल्ली बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शब्दगंधचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी होते. व्यासपीठावर जेष्ठ कवी व्ही. एस. वाळवेकर आणि सुधाकर गावडे उपस्थित होते.
प्रारंभी अंजली देशपांडे हिने शारदा गीत गायिले. मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. शब्दगंध कवी मंडळाचे सचिव सुधाकर गावडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी शब्दगंध कवी मंडळाचे जेष्ठ कवी व्ही. एस. वाळवेकर यांच्या ‘उरलं-सुरलं’ काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व्ही. एस. वाळवेकरांनी आपल्या मनोगतात आपल्या काव्य प्रेरणा सांगितल्या. तर अश्विनी ओगले यांनी काव्यासंग्रहाविषयी विचार मांडले.
यावेळी विविध साहित्यिक स्पर्धांमध्ये पारितोषिक मिळवलेल्या शब्दगंध कवी मंडळाच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अस्मिता अळतेकर, अस्मिता देशपांडे, स्मिता किल्लेकर, नेहा जोशी, जितेंद्र रेडकर, बसवंत शहापुरकर यांचा सत्कार झाला.
कार्यक्रमाला प्रा. चंद्रकांत पोतदार, डॉ. मनीषा नेसरकर, प्रा. सुभाष सुंठणकर, किशोर काकडे, मधू पाटील, भरत गावडे आदींसह कवी आणि मराठी रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अस्मिता देशपांडे यांनी केले तर आभार नेहा जोशी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

नंदिहळ्ळी – राजहंसगड रस्त्यावर बिबट्याचे दर्शन

Spread the love  बेळगाव : नंदिहळ्ळी – राजहंसगड रस्त्यावर आज रात्री बिबट्याचे दर्शन झाले, त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *