बेळगाव : २०१९ पासून समाजसेवेत कार्यरत असणाऱ्या मैत्रेयी कलामंच समुहातर्फे या वर्षीचा महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आपणही समाजाचे काही देणे लागतो हे नजरेसमोर ठेवून थोडी रक्कम जमा करून हे मंडळ वर्षभर अनेक उपक्रम कोणाच्याही मदतीशिवाय राबवत असते. अडचणीत असलेल्या महिलांना मदतीचा हात पुढे करत असते. दरवर्षी एक कर्तृत्ववान महिला, एक कष्टकरी महिला व एक असहाय्य गरीब महिला अशा तीन महिलांचा सन्मान या समुहातर्फे महिला दिनानिमित्त केला गेला आहे. मात्र यावर्षी महांतेशनगर येथील महानगर पालिकेच्या निराश्रित आश्रममध्ये जाऊन तेथील महिलांच्या सान्निध्यात महिला दिन साजरा करण्यात आला. आश्रमातील महिलांसाठी साड्या देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तेथील व्यवस्थापक महिलांनाही भेटवस्तू देऊन त्यांच्या उल्लेखनीय व उत्कृष्ट सेवेसाठी गौरविण्यात आले. तसेच आश्रमासाठी थोडे किराणा सामानही देण्यात आले.
त्या महिलांच्या सहवासात दोन तीन तास घालवताना त्यांच्या मुखावरील स्मित पाहून खुप समाधान मिळाले. सारे काही मिळूनही माणूस सहवासा साठीही भुकेला असतो हे प्रकर्षाने जाणवले. अशावेळी ईतर महिला मंडळांनीही तिथे जाऊन भेट दिल्यास एक श्रृंखला जोडली जाईल असे आवाहनही मैत्रेयी कलामंच समुहाने केले. तेथील व्यवस्थापकांनीही मैत्रेयी कलामंच समुहाचे कौतुक केले. यावेळी संघाचे कार्यकर्ते विश्वनाथ सव्वाशेरी हे देखील उपस्थित होते.
तसेच रोशनी हुंदरे, प्रा.मनीषा नाडगौडा, डॉ. मेघा भंडारी, स्मिता किल्लेकर, अस्मिता आळतेकर, अपर्णा पाटील, शीतल पाटील, दीपा कुलकर्णी या मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
अस्मिता देशपांडे, स्मिता पाटील, कोमल हुद्दार, अक्षता यळ्ळूरकर, अक्षता पिळणकर, डॉ.प्रेमा मेणशी, धनश्री मुचंडी या प्रत्यक्ष उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी त्यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे.