पणजी : दिल्ली मद्य घोटाळ्यातील कथित मनी लॉड्रिंगप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर, आता ईडीने आपली कारवाई सुरुच ठेवली आहे. याच प्रकरणात आता आम आदमी पक्षाचे गोव्याचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर आणि पक्षाच्या इतर दोन नेत्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्या सोबतच भंडारी समाजातील अशोक नाईक यांनाही एजन्सीने समन्स पाठवले आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने 28 मार्च रोजी या सर्वांना चौकशीसाठी दिल्ली कार्यालयात बोलावले आहे. ईडीचा आरोप आहे की, दिल्ली मद्य धोरणाच्या नावाखाली गोळा केलेला पैसा आम आदमी पक्षाने गोवा विधानसभा निवडणुकीत वापरला होता. मात्र, आपचेगोवा प्रमुख अमित पालेकर यांनी एजन्सीचे हे आरोप फेटाळून लावत पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवली असल्याचे म्हटले आहे.
‘कुठल्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार’
एजन्सीने आपल्या आरोपपत्रात दावा केला की, आपने साउथ लॉबीकडून मिळालेल्या 100 कोटी रुपयांपैकी गोवा निवडणूक प्रचारात सुमारे 45 कोटी रुपये वापरले होते. दरम्यान, अमित पालेकर यांनी गोव्यात बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याच्या आरोपांचे खंडन केले. तसेच, पक्ष कोणत्याही तपासाला सामोरे जाण्यास तयार असल्याचे सांगितले. दरम्यान, ईडीने अमित पालेकर यांच्यासह रामराव वाघ आणि दत्तप्रसाद नाईक यांनाही समन्स बजावले आहे.