बेळगाव : येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दि. 23 एप्रिल दिवशी ‘पुस्तक दिवस’ साजरा करण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी “आम्ही वाचतो” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अलीकडे बरेचसे विद्यार्थी वाचन करतात, जाणकारीने वाचतात, त्यांना साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम आवडतात, शिवाय विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ते भरपूर वाचन करतात, त्यामुळे पुस्तक दिनाच्या निमित्ताने या साऱ्याचा सकारात्मक मागोवा घेण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात विद्यार्थी “आम्ही वाचतो” मध्ये आपले विचार व्यक्त करणार असून विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व प्राध्यापकही भाग घेणार आहेत. तरी सर्वांनी उद्या सकाळी ठीक 11 वा सार्वजनिक वानालय, गणपत गल्ली, बेळगांव येथे उपस्थित रहावे असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष गोविंदराव राऊत यांनी केले आहे.