Saturday , December 13 2025
Breaking News

“त्या” बँकेचा अध्यक्ष की भ्रष्टाचाराचा भस्मासुर?

Spread the love

 

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बहुजनांच्या हितासाठी स्थापिलेल्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे दिवसागणिक अधिकाधिक भयंकर स्वरूपात बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला की काय असेच म्हणावे लागेल. सदर बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप एवढे मोठे आहेत की एका कुख्यात खंडणीखोर गुंडाला लाजवेल असा प्रकार सभ्यपणाचा मुखवटा लावून सुरू आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात कमिशन खाण्याचा भिकारपणा अध्यक्ष महोदय करतात असा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वर्षानुवर्षे कर्मचाऱ्यांचे पगार वाढ – बोनस आदी थकविले जातात आणि जेव्हा आकडा मोठा होतो तेव्हा त्यातील ५०% रकमेचे कमिशन महाशय मागतात हा निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल. स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी हे महाशय हा सगळा खंडणी व्यवसाय वरिष्ठ कर्मचाऱ्यांना हाताशी धरून एका माजी नगरसेवक व विद्यमान संचालक करवी केला जातो. जे कर्मचारी याला विरोध करतात त्यांचा अध्यक्ष महोदय मानसिक छळ करून त्यांना त्रास देतात.
सदर बँकेतील कर्मचाऱ्यांना कर्नाटक सरकारचा केसीएस कायदा व रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार दिला जातो. पण ज्यावेळी सहावा वेतन आयोग लागू झाला तेव्हा त्याची पूर्ण अमलबजावणी केली नाही. याच भ्रष्टाचारी अध्यक्षाने 2018 साली स्वतःच्या घरात बसून सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी ऐवजी स्वतः तयार केलेला पगार पॅटर्न बँकेत लागू केला. जेव्हा कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात विचारणा केली त्यावेळेला त्यांना उर्मटपणे अपमानित करून त्यांना हाकलून देण्यात आले व संपूर्ण प्रकार अध्यक्ष महोदय हे एक माजी नगरसेवक व विद्यमान संचालक यांना हाताशी धरून करत आले आहेत. याच माजी नगरसेवक व विद्यमान संचालकाने कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग संबंधित खोटी आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांचा आपल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान वापर करून घेतला. पण तदनंतर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता त्याने कर्मचाऱ्यांची मोठी फसवणूक केली. या संपूर्ण भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळून बँकेच्या माजी जनरल मॅनेजरने आपला राजीनामा दिला. ज्यावेळी त्या माजी जनरल मॅनेजरने आपली कैफियत “बेळगाव वार्ता” समोर मांडली त्यावेळी अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. ते सर्व प्रकार बँकिग क्षेत्राला काळीमा फासणारे आहेत. बँकेतून दिल्या जाणाऱ्या कर्जावर सदर अध्यक्ष महोदय 10% कमिशन घेतात. ज्या ग्राहकांचे कागदपत्र कमी असतात त्यांच्याकडून देखील कमिशन खाऊन कर्जे पास केली जातात.
सदर बँकेत सोने तारण ठेवून कर्ज देणारी बँक म्हणून प्रचंड ग्राहक जोडले होते पण त्यात देखील भ्रष्टाचार असल्याने आता सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील कमी झाली आहे. सोने तारण ठेवण्यासाठी सोन्याची तपासणी करणाऱ्या त्रयस्थ मोजदाराकडून जमा झालेल्या सोन्याच्या कचऱ्यावर अध्यक्ष महोदय दर महा कमिशन घेतात. अध्यक्ष कमी कमिशन एजेंट वाटणाऱ्या या माणसाने गेल्या चार वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा कहर केला आहे. बँकेत येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून प्रवेश फी आकारने तेवढेच शिल्लक राहिल्याचे दिसते. भ्रष्ट मार्गाने पैसा कमावण्याच्या नादात असे तुघलकी निर्णय घेण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही हा माणूस. बँकेचे अध्यक्ष असून देखील बँकेचे सीईओ असल्यासारखे संपूर्ण दिवस बँकेत ठाण मांडून असतात व बँकेच्या व्यवहारात ढवळाढवळ करतात. या अध्यक्षाने बँकेत आपल्या चमच्यांची एक टोळीच निर्माण केली आहे. यात बँकेच्या विद्यमान जनरल मॅनेजरपासून मुख्य शाखेचा शाखा व्यवस्थापक सुद्धा सामील आहे. हे शाखा व्यवस्थापक तर महाभारतातील ‘संजय’ प्रमाणे इत्यंभूत माहिती अध्यक्षांपर्यंत पोहचवत असतात. स्वतःची बढती देखील या शाखा व्यवस्थापकाने अशीच चाटूगिरी करून मिळवली आहे. अश्या या चमच्यांच्या टोळकीला हाताशी धरून या अध्यक्षाने एक नामांकित सहकार बँक अक्षरशः लुबाडून खाल्ली आहे. बँकेत काम करणाऱ्या प्रामाणिक व मेहनती कर्मचाऱ्यांना डावलून अध्यक्षांची चमचेगिरी करणाऱ्या लोकांकडून पैसे उकळून बढती दिली जाते.
भ्रष्टाचाराचा हा प्रकार बेळगावच्या सहकार क्षेत्रातला सगळ्यात भयंकर प्रकार आहे. सहकार क्षेत्राला काळीमा फासणारा हा उद्योग असून भागधारक आणि ग्राहकांमध्ये याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. याच अध्यक्षाने आपल्या नात्यातील एका विकृत माणसाला बँकेचे जनरल मॅनेजर पद बहाल केले आहे.

(क्रमशः)

About Belgaum Varta

Check Also

युवा समितीच्या वतीने आयोजित सामान्यज्ञान स्पर्धा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार

Spread the love  महामेळाव्याला आडकाठी आणणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *