खानापूर : युवकांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यास समितीला निश्चित यश मिळेल असा विश्वास समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले आहे.
कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी हलशी येथे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेळके यांनी गेली अनेक वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत एक मत दिल्लीला म्हणून आपण मते वाया घालत आलो होतो. मात्र या निवडणुकीत सर्वांनी समितीला मत देऊन आपले अस्तित्व दाखवून देणे गरजेचे आहे. बेळगाव प्रमाणेच खानापूर तालुक्यात देखील कन्नड सक्ती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात समितीच्या पाठीशी राहिलो नाही तर आपल्या भाषेचे मारेकरी आपणच ठरणार आहोत. सरदेसाई यांच्या उमेदवारीमुळे खानापूर तालुक्यात पुन्हा एकदा समिती कार्यकर्ते चार्ज झाले आहेत त्यामुळे समितीला चांगले यश मिळेल असे मत व्यक्त केले.
प्रारंभी हलशी बसस्थानक परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सरदेसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी ग्राम पंचायत सदस्य अर्जुन देसाई यांनी हलशी भागातून समितीला नेहमीच पाठबळ मिळाले आहे. या निवडणूकीत देखील समितीला मोठ्या प्रमाणात मते मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
गावामध्ये फेरी काढून आणि रोजगार सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या आणि पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, रणजीत पाटील, संजीव पाटील, सुनिल पाटील, रमेश धबाले, प्रल्हाद कदम, गणेश पेडनेकर, सचिन गुरव, पांडुरंग देसाई, किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, नारायण मुचंडीकर, मोहन गुरव, अभिजित सरदेसाई आदी उपस्थित होते.
…………………………………………………………………
समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी लोंढा गावामध्ये भव्य फेरी काढण्यात आली. यावेळी प्रचार पत्रकांचे वितरण करण्यात आले. यावेळी नागरिकांनी समितीच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे आश्वासन देत समितीने सातत्याने या भागातील मराठी भाषिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात आणि त्याच्या सोडवणूकीसाठी प्रयत्नशील राहावे असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.