बेळगाव : हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याच हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय म्हणून काम करणाऱ्या इसमाचा सफाई काम करताना हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.
सुरज देवगेकर असे मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी वॉर्डबॉयचे नाव असून तो विजया हॉस्पिटलचा कर्मचारी होता. वॉर्डबॉयचे काम करणाऱ्या सुरजला सफाईचे काम दिले होते. या कामाचा अनुभव नसल्यामुळे सुरज सफाई करतेवेळी तोल जाऊन इमारतीवरून खाली पडला. या घटनेत सुरज याचे दोन्ही हात व पाय त्याचबरोबर बरगड्या देखील फ्रॅक्चर झाल्या होत्या तसेच त्याला डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तो गंभीर स्थितीमध्ये पडून होता. घटनेची माहिती हॉस्पिटल प्रशासनाला समजतात त्याच हॉस्पिटलमध्ये सुरज याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र डोक्याला जबर मार लागल्यामुळे उपचारादरम्यान सुरज याचा मृत्यू झाला.
सुरज देवगेकर हा गेल्या काही वर्षापासून विजया हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करीत होता. त्याच्या अपघाती मृत्यूचा पंचनामा करून जिल्हा इस्पितळात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेची नोंद मार्केट पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta