बेळगाव : हुबळीधील अंजली आंबिगेर नामक तरुणीची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी आज बेळगावमधील जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते.
बेळगाव जिल्हा कोळी बेस्त समाजाच्या वतीने चन्नम्मा सर्कल येथे मानवी साखळी करून आपला रोष व्यक्त केला. अंजलीच्या मारेकऱ्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली यासंदर्भात पोलिसांकडे तोंडी तक्रार करूनही पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे अंजलीचा खून झाला. हुबळीतील नेहा हिरेमठ खु प्रकरणातील आरोपीवर पोलिसांनी कडक कारवाई केली असती तर अशा घटना पुन्हा घडल्या नसत्या, असा आरोप बेस्त कोळी समाजातील नेत्यांनी केला. नेहा आणि अंजलीच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी किंवा एन्काउंटर करावा तसे न केल्यास दोन्ही मारेकऱ्यांना आपल्या ताब्यात द्यावे, अशी संतापजनक मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
यावेळी बोलताना साबण्णा तळवार म्हणाले, हुबळीतील अंजली आंबिगेर या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ बेळगावमधील कोळी बेस्त समाजाच्या वतीने आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले असून हुबळीत सलग दुसऱ्यांदा हत्येची घटना झाली असून अद्याप आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
माजी उपमहापौर मधुश्री पुजारी यांनीही हुबळीतील खून प्रकरणाचा निषेध केला. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून एका पाठोपाठ एक अशा दोन तरुणींचा खून करण्यात आला, राज्यातील सुरक्षेसंदर्भात सरकारने गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात बेस्त समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, धरेप्पा पुजारी आदींसह समाजातील बांधव उपस्थित होते.