बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी व राज्य मराठी संस्था मुंबई यांच्यातर्फे गुरुवार दिनांक 30 मे रोजी ‘मातृभाषेतून शिक्षणाची गरज’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव मधील तज्ञ शिक्षक व निवृत्त मुख्याध्यापक श्री. प्रतापसिंह चव्हाण हे या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. सद्यस्थितीत मराठी भाषा व या भाषेतून मिळणारे शिक्षण हे महत्त्वाचे असून शिक्षणाचा पाया पक्का होण्यासाठी मातृभाषेतून शिक्षणाची गरज आहे म्हणूनच या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बेळगाव परिसरातील ज्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते व ज्यांनी 12 वी च्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत पास होण्याचा बहुमान पटकाविला आहे अशा विद्यार्थ्यांचा सत्कार ही आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये प्रणव पांडुरंग पाटील, सायली सुमारे, प्रणय पांडुरंग पाटील, विजय देसाई, संजना पाटील, सौजन्या जत्राटी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात ठीक अकरा वाजता संपन्न होणार आहे. तरी बेळगाव परिसरातील मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर व सचिव सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.