

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीला लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये काहीशी मरगळ आली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महाराष्ट्र एकीकरण समितीचे अस्तित्व संपते की काय अशी भावना निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात भीती करून राहिली आहे. अशावेळी समितीने कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या पराभवाची कारणमीमांसा करणे गरजेचे होते. उशिरा का होईना तालुका समितीने याबाबत थोड्याफार हालचाली केल्याचे पाहायला मिळत असताना शहर समितीत मात्र म्हणावी तशी कोणतीच स्थित्यांतरे दिसत नाहीत. याउलट शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावावर काही “स्वयंघोषित नेते” आपले घोडे पुढे दामटवत असल्याचे दिसत आहेत. शहर समितीची जम्बो कार्यकारिणी कागदावर जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र शहर महाराष्ट्र एकीकरण समितीची पुनर्रचना अद्याप झालेली नाही त्यामुळे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे “लेटरहेड” हे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या नावानेच आहे. असे असताना सध्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाचे दुसरेच “लेटरहेड” काही स्वयंघोषित नेत्यांचा संपर्क क्रमांक घालून वापरात आणल्याचे निदर्शनास येत आहे. या “लेटरहेड”चा वापर करून हुतात्मादिनाचे आवाहन देखील करण्यात आले, त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये या “लेटरहेड”वरून कुजबूज देखील झाली. परंतु शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्यामुळे या तथाकथित नेत्यांचे अधिकच पावले गेले व याच “लेटरहेड”चा वापर करून महाराष्ट्रातील नेत्यांना सीमा भागातील विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आली. एवढ्यावरच हे स्वयंघोषित “महाभाग” थांबले नाहीत तर त्यांनी चक्क सीमाभागातील होतकरु तरूणांना नोकरीचे आमिष दाखवत “जीवाची मुंबई” केली अशी चर्चा समितीनिष्ठ कार्यकर्त्यातून होत आहे. या “लेटरहेड”मध्ये अशा लोकांचाही समावेश आहे की ज्यांचा शहर समितीच्या व्यापक कार्यकारिणीवर देखील समावेश नाही. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाने चाललेला हा एकंदर प्रकार पाहता अधिकृत शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या किल्ल्या स्वतःकडे ओरबाडून घेण्याचा तर हा प्रकार नसेल ना असा सवाल सर्वसामान्य कार्यकर्त्यातून उपस्थित होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta