बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधनी व राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नाटक व कथाकथन या माध्यमांचा मराठी अध्यापनात कशाप्रकारे वापर करावा हा या कार्यशाळेचा उद्देश होता. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आर.पी.डी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक प्रा. परसू गावडे व नाट्यदिग्दर्शक शिवराज चव्हाण उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. इंद्रजीत मोरे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते गुरुवर्य वि. गो. साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रबोधिनीचे सचिव श्री. सुभाष ओऊळकर, श्री. प्रतापसिंह चव्हाण, नीला आपटे, गजानन सावंत, नारायण उडकेकर उपस्थित होते. श्री. सुभाष ओऊळकर यांनी मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर पहिल्या सत्रामध्ये प्राध्यापक परसू गावडे यांनी नाट्यीकरणाचा उपयोग अध्यापनामध्ये कसा करावा व नाटक या माध्यमाचा सर्व विषयांशी सहसंबंध कसा जोडावा याविषयी मार्गदर्शन केले. तर शिवराज चव्हाण यांनी कथाकथन या माध्यमाचा मराठी अध्यापनात कशाप्रकारे वापर करावा याविषयी मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रामध्ये शिक्षकाने वेगवेगळ्या विषयावरील छोट्या छोट्या नाटिका सादर केल्या तसेच शैक्षणिक साहित्य निर्मिती ही संकल्पना ही समजून घेतली. या कार्यशाळेत बेळगाव परिसरातील एकूण 70 शिक्षकांनी सहभाग घेतला कार्यशाळेच्या नियोजनासाठी प्रबोधिनीचे सदस्य बी. बी. शिंदे, प्रसाद सावंत, धीरजसिंह राजपूत, गौरी चौगुले, स्नेहल पोटे, हर्षदा सुंठणकर यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन इंद्रजित मोरे यांनी केले. आभार गजानन सावंत यांनी मानले.