कागवाड येथे ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाचे सामूहिक पारायण
कागवाड : वारकरी संप्रदायातील सर्व संतांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, व्रत-वैकल्य काढून टाकण्याचे महान काम केले. संत ज्ञानेश्वरांनीही विज्ञाननिष्ठ जाणिवेतून ग्रंथ लिहिले. ज्ञानेश्वरी व भगवत गीता या दोन ग्रंथांमध्ये अर्जुन आणि कृष्ण या दोघांचा सुसंवाद असला तरी जीवनाची महत्त्वाची मूल्ये, आचरणातील समीकरणे सुलभ करून उपदेश केला आहे. ते उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणले तर प्रगल्भ आणि निकोप समाज निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन प्रा. अशोक आलगोंडी यांनी केले.
येथील विठ्ठल मंदिरात मराठा समाज कमिटीच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद महाविद्यालयाचे प्रा. अशोक आलगोंडी बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा समाज कमिटीचे अध्यक्ष राजू लांडगे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून जेष्ठ पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी, अरुण जोशी, अमर शिंदे, दीपक जाधव, शंकर चव्हाण उपस्थित होते.
बोलताना प्रा. अशोक आलगोंडी पुढे म्हणाले, सर्व सामान्यांना आणि स्त्री-शूद्र आदी वंचित, पीडितांनाही गीतेचा भावार्थ सांगण्याच्या उद्देशाने संत ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली. या ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरीची ‘एक तरी ओवी अनुभवावी’ अश्याप्रकारे अनुभवली तर परमानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. शांतरसप्रधान असलेली ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांची अमृतवाणी आहे. तिचा हळुवारपणे आस्वाद घ्यायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रारंभी ज्ञानेश्वरी मधील शेवटच्या अध्यायाचे सामूहिक पारायण करून आरती म्हणण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते प्रा. अशोक आलगोंडी यांचा सन्मान करण्यात आला. शेवटी ग्रामस्थांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कृष्ण जन्माष्टमी निमित्त महिलांनी श्री कृष्णाला पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा केला.
यावेळी गावातील ग्रामस्थ, वारकरी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार अरुण जोशी यांनी मानले.