बेळगाव : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणावेळी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हटविण्यास सांगणारे रायचूरचे जिल्हा न्यायाधीश मल्लिकार्जुन गौड यांच्या निषेधार्थ बेळगावात आज विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्या अनिश्चित वर्तनाचे पडसाद कर्नाटकात उमटतच आहेत. बेळगावात आज दुसऱ्या दिवशीही न्या. गौड यांच्या निषेधार्थ विविध दलित संघटनांनी निदर्शने केली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सफाई मजदूर संरक्षण समिती आणि आदी जाम्बव समाजसेवा संघातर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी न्या. मल्लिकार्जुन गौड यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्यावरून निदर्शकांनी संताप व्यक्त केला. यावेळी बोलताना दलित नेते विजय निरगट्टी म्हणाले, महापुरुषांचा अवमान करणारे बेशिस्त वर्तन केल्याबद्दल न्या. मल्लिकार्जुन गौड यांच्यावर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा. ही घटना घडून ३ दिवस लोटले तरीही सरकार काही कारवाई करत नाहीय. यामुळे दलित समाज दुखावला गेलाय असे त्यांनी सांगितले. या निदर्शनात सफाई मजदूर संरक्षण समिती आणि आदीजाम्बव समाजसेवा संघाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta