बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार मिळाल्याबद्दल एम. व्ही. हिरेमठ यांचा जिव्हाळा फाउंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. बेळगाव नगरविकास प्राधिकरणाचे सहाय्यक अभियंता एम. व्ही. हिरेमठ यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानिमित्त रविवारी हॉटेल संकम येथे जिव्हाळा फाउंडेशनच्यावतीने त्यांचा सत्कार करून गौरविण्यात आले. यावेळी जिव्हाळा फाउंडेशनचे सल्लागार डॉ. रवींद्र अनगोळ, डॉ. अनिल पोटे, अध्यक्षा सुरेखा पोटे, शेखर पाटील यांच्याहस्ते हिरेमठ यांचा सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना एम. व्ही. हिरेमठ यांनी अनेक अनुभवांचे कथन केले. सेवाभाव ठेवून काम केल्यास लोकांचा विरोध मावळतो व लोक स्वतःहून सहकार्य करतात. खानापूर तालुक्यातील नेरसा ते कोंगळा हा रस्ता तसेच बंधारे, साकव बनवतानाचा अनुभव अंगावर शहारे आणणारा होता.
ते पुढे म्हणाले, सरकारी सेवेत सुप्रशासन कसे द्यावे हे सर्वात महत्त्वाचे. सरकारी सेवेचा गर्व न बाळगता लोकांच्या सेवेसाठी कार्यरत राहून काम केले आहे. फळाची अपेक्षा न करता चांगले कार्य करून दाखविले आहे. मी या पुरस्कारासाठी अर्जही केला नव्हता. पण सरकारने माझ्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार दिला.
यावेळी जिव्हाळा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता कद्दु, उपाध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ, सेक्रेटरी आरती निप्पाणीकर, संजीवनी पाटील, मरियम तेबला, सुहास हुद्दार, अमित पाटील, शिबा पाटील, मनाली पोटे, संतोष तालपतुर आदी उपस्थित होते.