बेळगाव : महात्मा गांधी विचार मंच, गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) यांच्या वतीने यंदाचा पहिला “महात्मा गांधी विचार गौरव पुरस्कार” ज्येष्ठ सीमासत्याग्रही कॉम्रेड कृष्णा मेणसे यांना जाहीर झाला आहे.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर रोजी 11 वाजता मराठी विद्यानिकेत येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रा. सुभाष कोरे यांनी दिली.
महात्मा गांधी विचार मंच गडहिंग्लज या संस्थेच्या वतीने गडहिंग्लज, चंदगड, आजरा या भागात विविध उपक्रमांच्या माध्यमातून गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महात्मा गांधींवर 75 व्याख्याने दिली आणि “गांधी विचारांचा जागर” केला. त्याचप्रमाणे यावर्षी लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त या भागात शाहू विचारांचा जागर करण्यासाठी 150 व्याख्याने शाळा, महाविद्यालयांमध्ये देण्याचा उपक्रम सुरू आहे तसेच या वर्षीपासून समाजातील गांधीवादी, विचारवंत, कृतिशील कार्यकर्ते, समाजसेवक अशा महनीय व्यक्तींची निवड करून महात्मा गांधी विचार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीच्या या पुरस्कारासाठी प्रत्यक्ष महात्मा गांधी, विनोबा भावे यांच्यासमवेत काही काळ कार्य केलेले कॉम्रेड कृष्णा मेणसे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतलेला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा लढ्यात देखील ते सक्रिय राहिलेले आहेत. साराबंदी आंदोलनात त्याचप्रमाणे गोवा मुक्ती आंदोलन, कामगार चळवळ, कम्युनिस्ट चळवळ यामध्ये देखील कृष्णा मेणसे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी प्रा. आनंद मेणसे, कृष्णा शहापूरकर, सुरेश पवार, प्रा. सुनिल शिंत्रे, सातप्पा कांबळे, अंजली रेडेकर आदी उपस्थित होते.