बेळगाव : आजारी असल्याने हात धरून उठवत असतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक सुरेश कुरडेकर रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव यांनी आपल्या ओळखीच्या दिव्या प्रदीप सपकाळे (रा. बसवाण गल्ली शहापूर) यांच्या घरी आपल्या आईला भाडोत्री ठेवले होते. आईची विचारपूस करण्यासाठी विनायक अधूनमधून दिव्याच्या घरी जात असे. काही दिवसांपूर्वी दिव्या आजारी असल्याने झोपली होती. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विनायक तिच्या खोलीत गेला असता विनायकने तिला हात धरून उठवले. मात्र त्याचा व्हिडीओ करून विनायकला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याच्याकडे 25 लाखांची मागणी केली. विनायकने घाबरून आधी ५ लाख रूपये दिले. इतकी रक्कम मिळताच संशयितांनी पुन्हा त्याच्याकडे रक्कमेसाठी तगादा लावला. यानंतर विनायकने १० लाख रूपये दिले. यानंतर पुन्हा १० लाखाची मागणी सुरू झाली. यापैकी ७ लाख देण्याची कबुली विनायककडून घेतली. सात लाख दिल्यानंतरही आपल्याला ब्लॅकमेल करणार नाहीत, याची शाश्वती विनायकला नव्हती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी त्यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त याडा मार्टिन, डीएसपी रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सर्व तपशील घेऊन मंगळवारी रात्री उशिरा यासंबंधीची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. बुधवारी सकाळी या प्रकरणातील दिव्या सपकाळे (वय २३, रा. बसवाण गल्ली, शहापूर), प्रशांत ऊर्फ स्पर्ष कल्लाप्पा कोलकार (२५, रा. गाडेमार्ग शहापूर), कुमार ऊर्फ डॉली अर्जुन गोकरक्कनवर (२९, रा. ज्योतिर्लिंग गल्ली, चौथा क्रॉस, कणबर्गी) व राजू सिद्राय जडगी (२९, रा. वाल्मिकीनगर, कणबर्गी) व मारुती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. सर्वांवर हनीट्रॅप व अपहरणाचा गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सीमानी, उपनिरीक्षक बी. ए. चौगला, आर. आय. सनदी, नागराज ओसाप्पगोळ, शिवशंकर गुडदैगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादीमनी, संदीप बागडी, सिद्धरामेश्वर मुगळखोड, विजय कमते महिला पोलीस श्रीमती कावेरी कांबळे, कु. प्रतिभा कांबळे यांनी ही कारवाई केली.