खानापूर : खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये लवकरच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार असून ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांवर अतिरिक्त भार आहे त्या डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातील, असे आश्वासन खानापूर तालुका आरोग्य अधिकारी महेश कीडसन्नावर यांनी दिले आहे.
शिवस्वराज संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी आरोग्य अधिकारी महेश कीडसन्नावर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी सरदेसाई यांनी हलशी प्राथमिक आरोग्यं केंद्रामध्ये रुग्ण मोठ्या संख्येने येत असतात परंतु हलशी येथील डॉक्टरांवर गणेबैल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागत आहे याची दखल घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांवर अतिरिक्त भार येणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे बंद आहेत ती पुन्हा सुरू करावीत, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली.
यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाला चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत काही गावांमध्ये नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव आणि आराखडा देण्यात आला आहे त्याची लवकरच अंमलबजावणी होणार आहे तसेच खानापूर तालुक्यासाठी मंजूर झालेल्या जागा लवकरच भरती कराव्यात यासाठी ही प्रयत्न सुरू आहेत तसेच शिवस्वराज्य संघटनेतर्फे मांडण्यात आलेल्या समस्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती दिली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी रमेश धबाले, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजीत पाटील, सुनिल पाटील आदींनी विविध भागातील समस्या मांडल्या. संघटनेचे मिलिंद देसाई, प्रभू कदम, संदेश कोडचवाडकर, सुधिर नावलकर, कृष्णा पाटील, पुंडलिक पाटील, संतोष काजुनेकर आदी उपस्थित होते.
…………………………………………………………………….
खानापूर येथील सरकारी दवाखान्यात येणाऱ्या मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मराठी भाषेला प्राधान्य देऊन मराठीतून फलक लावावेत अशी मागणीही यावेळी शिवस्वराज संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी लवकरच मराठी भाषेतील फलक ठळकपणे लावला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.