Thursday , June 4 2026
Breaking News

श्री नागेश महारुद्र मंदिर कळसाची शोभायात्रा 20 एप्रिल रोजी

Spread the love

 

खानापूर : नागुर्डा, नागुर्डावाडा आणि विश्रांतवाडी या परिसरातील ग्रामस्थांचे आराध्य व थळदैवत असलेल्या श्री नागेश महारुद्र मंदिराच्या जीर्णोद्धाराशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बैठक शनिवार, दि. १८ एप्रिल रोजी मंदिर परिसरात पार पडली. या बैठकीत मंदिराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याने कळस, नंदी, गणेश मूर्ती इत्यादींची विधीपूर्वक स्थापना करून पुढील काळात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरासाठी लागणाऱ्या मूर्ती व कळस पंढरपूर येथून आणण्यात आले असून, कळसारोहणापूर्वी स्थानिक भाविकांना दर्शन घेण्याची संधी मिळावी या हेतूने शोभायात्रा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानुसार सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष श्री. निरंजन उदयसिंग सरदेसाई यांनी दिली.

या धार्मिक कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागुर्डा, नागुर्डावाडा व विश्रांतवाडी येथील महिला व पुरुष बहुसंख्येने सहभागी होणार आहेत. श्री नागेश महारुद्र हे सरदेसाई कुटुंबाचे कुलदैवत असल्यामुळे कळस सध्या देसाई गल्लीत श्री निरंजन सरदेसाई यांचे घरी सरदेसाई वाडा येथे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शोभायात्रेला सुरुवात याच ठिकाणाहून होणार आहे.

ही शोभायात्रा देसाई गल्ली येथून प्रारंभ होऊन मलप्रभा नदी घाट, त्यानंतर अर्बन बँक परिसरातील श्री नागेश या कुलदेवाच्या मंदिर स्थळाला भेट देईल. पुढे देसाई गल्ली, घोडे गल्ली, निंगापूर गल्ली, शिवस्मारक, स्टेशन रोड, लक्ष्मी मंदिर, विठोबा देव गल्ली, गुरव गल्ली मार्गे रावळनाथ मंदिर येथे पोहोचेल. त्यानंतर घाडी गल्ली, धर्मवीर संभाजी चौक, पारिश्वाड क्रॉस मार्गे चौराशी देवी मंदिर येथे जाऊन पुढे जांबोटी क्रॉस मार्गे विश्रांतवाडी येथे दुपारच्या जेवणासाठी थांबेल. यानंतर शोभायात्रा नागुर्डा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडे रवाना होईल आणि गावातील प्रमुख रस्त्यांवरून मार्गक्रमण करत अखेरीस नागुर्डावाडा येथील गणपती मंदिरात समारोप करण्यात येईल.
या पवित्र सोहळ्यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या मंदिर संबंधी बैठकीस मंदिर बांधकाम समितीचे अभिजित सरदेसाई, कृष्णा धुळ्याचे, रवळू वडगांवकर, बाळाप्पा बिर्जे, नामदेव पाटील, नागेश पाटील (पुणे), ज्ञानेश्वर पाटील, नागेश पारवाडकर, मारुती पाखरे, बाबुराव खन्नूकर, राघोबा चापगांवकर, जयराज चापगांवकर, भैय्या चव्हाण, मारुती देसूरकर, आप्पण्णा हुंदरे आदी उपस्थित होते. तसेच श्री आबासाहेब दळवी, कृष्णा महाजन, मारुती पाटील आणि धाकलू बिर्जे यांनी भाग घेऊन मते मांडली.

About Belgaum Varta

Check Also

मध्यवर्ती म. ए. समिती जो आदेश देईल त्याला खानापूर तालुका म. ए. समितीचा पाठिंबा

Spread the love खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकडे समितीची बैठक खानापूर म. ए. समितीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *