बेळगाव : बेळगाव तालुक्यातील शिंदोळी गावातील मसणाई देवस्थानाच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. या देवस्थानातील चांदीचे दागिने चोरीला गेले असून मंदिरातून दागिने चोरणाऱ्या चोरट्यांनी महिलेला विहिरीत ढकलून तिची हत्या केल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. भारती पुजारी (रा. शिंदोळी, वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून पहाटे ४ च्या सुमारास घरातील जनावरांचे शेण टाकण्यासाठी सदर महिला गेल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. याचदरम्यान घराशेजारी असणाऱ्या मसणाई देवस्थानात चोरी देखील झाली असून देवस्थानात चोरी करणाऱ्या चोरांना सदर महिलेने पाहिल्यामुळे चोरांनी हि बाब पसरू नये यासाठी महिलेला विहिरीत ढकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. सकाळी सदर महिला घरी परतली नाही हे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी देवस्थानाच्या समोर शेणाची बुट्टी आणि चप्पल निदर्शनात आल्यामुळे या घटनेनंतर तातडीने मारिहाळ पोलिसांना माहिती देण्यात आली. तपासणी दरम्यान विहिरीत डोकावून पाहता महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या प्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta