संजीवीनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिन
बेळगाव : जीवनात आनंद मिळवायचा असेल तर ज्येष्ठांनी तरुण पिढीला समजून घेऊन आणि तरुण पिढीने ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग करून घेत समन्वय साधत वाटचाल केली पाहिजे तरच दुःखाला सामोरे न जाता आनंदाने जगता येईल.
जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे माणसाला दुःखाचा सामना करावा लागतो. यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वृद्धापकाळानुसार जीवनात बदल करणे काळाची गरज आहे, असे उद्गार कोल्हापूर येथील प्रा. युवराज पाटील यांनी काढले.
संजीवीनी फौंडेशनतर्फे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ‘उमंग २०२४’ कार्यक्रमाचे मंगळवारी कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरमध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते,
व्यासपीठावर संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ, सीईओ मदन बामणे, बर्डस संस्थेचे आर. एम. पाटील, शिवाजी कागणीकर, करुणालय संस्थेच्या संस्थापिका अनिता रॉड्रीग्ज उपस्थित होते.
युवराज पाटील पुढे म्हणाले, संवाद हा आनंद निर्मितीचे साधन आहे. मात्र, समजूतदारपणा हा आजच्या जीवनात कमी होत चालल्याने विभक्त कुटुंब पद्धत वाढू लागली आहे. एकत्र कुटुंबामध्ये किरकोळ कारणातून मतभेद निर्माण होऊन प्रत्येक घरात भिंती उभ्या राहतात, इथपर्यंत ठीक आहे. मात्र, मनामनात मिती उभ्या राहतात, याचं करायचं काय? असा प्रश्नही त्यांनी केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सविता देगीनाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना संजीवीनी फौंडेशनच्या माध्यमातून जे काळजीकेंद्र चालवले जाते याबद्दल विस्तृत माहिती दिली व उपस्थित मान्यवर आणि श्रोत्यांचे स्वागत केले.
डॉ. शांता चंद्रशेखर यांच्या गणेशवंदनेनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
मदन बामणे यांनी प्रा. युवराज पाटील यांचे शाल स्मृतिचिन्ह आणि सुकामेव्याची टोकरी देऊन स्वागत केले.
प्रमुख पाहुणे आणि सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. सुरेखा पोटे यांनी करून दिला.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या शिवाजी कागणीकर, अनिता रोड्रिग्स आणि आर. एम. पाटील यांचा सन्मान अजित देगीनाळ, संध्या देगीनाळ, रेखा बामणे, डॉ. सुरेखा पोटे, प्रीती चौगुले, डॉ. नविना शेट्टीगार, संजय पाटील, विद्या सरनोबत यांच्या हस्ते शाल स्मृतिचिन्ह आणि सुकामेव्याची टोकरी देऊन करण्यात आला.
अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी ‘उमंग २०२४’ या कार्यक्रमाबद्दल माहिती सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित नृत्य आणि गायन स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल स्पर्धकांचे आभार मानले आणि वेळेअभावी फक्त निवडक स्पर्धकांना सादरीकरण करता आल्याने नाराज झालेल्या इतरांच्या भावनांचा आदर राखत पुढील वर्षी दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करू असे सांगितले.
कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन मधुरा शिरोडकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी गायन आणि नृत्य सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळविली.
यावेळी गायन स्पर्धेत प्रथम श्रीनिवास नाईक, द्वितीय कृष्णा मरदूर
तर राजेंद्र कर्नाटकी यांनी तृतीय क्रमांक पटकावला नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रेमा उपाध्ये, द्वितीय क्रमांक वनिता जोशी, तृतीय क्रमांक राजश्री हावळ यांनी पटकावला.
समूह नृत्य स्पर्धेत डॉ. सुरेखा भांडारे गटाने प्रथम तर द्वितीय क्रमांक घरकुल गटाने पटकावला.
यावेळी घरकुल वृध्दाश्रमातील आज्जीआजोबांच्या भले बुरे ते घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर…. या गाण्यावरील नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली.
याप्रसंगी संजीवीनी फौडेशनचे संचालक, ,सल्लागार सदस्य, ज्येष्ठ नागरिक व रसिक श्रोते उपस्थित होते.