बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या येथील पायोनियर अर्बन बँकेची पाचवी आणि बेळगाव तालुक्यातील पहिली शाखा हिंडलगा येथे रविवारी समारंभपूर्वक सुरू होत आहे.
पायोनियर बँकेच्या सध्या कलमठ रोड बेळगाव येथील मुख्य शाखा, मार्केट यार्ड, गोवावेस आणि शहापूर अशा चार शाखा कार्यरत असून आणखी तीन शाखा काढण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेने परवानगी दिली आहे. या तिन्ही शाखा पैकी पहिली शाखा हिंडलगा येथे सुरू होत असून पुढील आठवड्यात दुसरी शाखा कणबर्गी येथे आणि त्यानंतर तिसरी शाखा येळळूर रोड वडगाव येथे सुरू होणार आहे.
गेल्या आर्थिक वर्षात पायोनियर बँकेने दोन कोटी पाच लाखाचा निव्वळ नफा मिळवला असून ही बँकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
आंबेवाडी क्रॉस वर हिंडलगा- सुळगा रोडवर रविवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू होत असलेल्या या शाखेचे उद्घाटन कर्नाटकच्या महिला व बालकल्याण मंत्री सौ.लक्ष्मीताई हेब्बाळकर यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे राहणार आहेत. या कार्यक्रमास माजी आमदार रमेश कुडची, मनोहर किणेकर व मनोहर कडोलकर, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एन. एस. चौगुले, बांधकाम व्यवसायिक आर. एम. चौगुले, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी अतिवाडकर, तालुका पंचायत सदस्य एस. एल. चौगुले, माजी बुडा अध्यक्ष युवराज कदम याचबरोबर हिंडलगा, आंबेवाडी, सुळगा, उचगाव, तुरमुरी या परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सभासद व हितचिंतकानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर व सहकाऱ्यांनी केले आहे.
——————————————————————–
विशेष ठेव योजना
या शाखेच्या उद्घाटनानिमित्त 20 ऑक्टोबर पर्यंत ठेवीवर 8.75% इतके व्याज देण्यात येणार आहे. बँकेत सोने तारण कर्ज, गृह कर्ज, वाहन कर्ज व इतर सर्व प्रकारची कर्जे उपलब्ध असल्याने त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहनही अष्टेकर यांनी केले आहे.