बेळगाव : 1 नोव्हेंबर 1956 साली भाषावार प्रांतरचना झाली आणि बेळगावसह संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आला. त्याच्या निषेधार्थ समस्त सीमावासीय 1 नोव्हेंबर हा काळा दिन म्हणून आचरणात आणतात. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने विराट सायकल फेरी काढण्यात आली.
निषेध फेरीसाठी सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, महिला, आबालवृद्ध संभाजी उद्यानात जमू लागले आहे. काळ्या दिनी काळी वस्त्रे परिधान करून समितीच्या बॅनरसह “बेळगांव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. यावेळी केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी बालचमू देखील काळे झेंडे दाखवत निषेध फेरीत सहभागी होत आपली महाराष्ट्रात जाण्याची इच्छा देखील व्यक्त केली.
सकाळी 9.30 वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली निषेध फेरीला सुरवात झाली. संभाजी उद्यानातून सुरवात झालेली फेरी भांदुर गल्ली मार्गे अंबाभवन रोड, शिवाजी रोड, हेमू कलानी चौक, ताशीलदार गल्ली, पाटील गल्ली, कपिलेश्वर उड्डाणपूल मार्गे एसपीएम रोड, होसुर रोड, नार्वेकर गल्ली, आचार्य गल्ली, सराफ गल्ली, खडेबाझार शहापूर मार्गे कचेरी गल्ली, मिरापूर गल्ली, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल मार्गे मराठा मंदिर रेल्वे ओव्हरब्रीज येथे निषेध फेरीची सांगता करण्यात आली.
यावेळी समितीचे नेते, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.