सावगाव येथे युवा आघाडीतर्फे नृत्य स्पर्धा
बेळगाव : ग्रामीण भागातील लोककला जपायची असल्यास प्रथम मराठी भाषा आणि संस्कृती टिकली पाहिजेत. त्यामुळे मराठी भाषेसाठी लढणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी मराठी भाषिकांनी पाठबळ देणे काळाची गरज आहे. तसेच विविध प्रलोभने दाखवणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या नादी न लागता मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी समितीसोबत राहावे, असे आवाहन तालुका महाराष्ट्र समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा व महिला आघाडी शाखा सावगाव यांच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे उद्घाटन फीत कापून करून आर. एम. चौगुले बोलत होते. अध्यक्षस्थानी मारुती कदम होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वल तसेच प्रतिमापूजन करण्यात आले.
चौगुले पुढे म्हणाले, ६७ वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समिती मराठी भाषिकांच्या प्रश्नासाठी लढा देत आहे. यासाठी सीमाभागातील मराठी भाषकांची ताकद समितीच्या पाठीशी भक्कमपणे असणे गरजेचे आहे. डॉ. नितीन राजगोळकर म्हणाले, मराठी संस्कृती सीमाभागात जपली जाते. त्यामुळे यापुढेही डान्स असो किंवा अन्य स्पर्धा असोत, त्या भरविल्या पाहिजेत. यातून नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासह व्यासपीठ उपलब्ध होते. माजी ता. पं. सदस्य कृष्णा हुंदरे म्हणाले, सावगाव, मंडोळी, हंगरगे ही तिन्ही गावे समितीचा बालेकिल्ला आहेत. या ठिकाणी आजही समितीची ताकद कायम आहे. यावेळी म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्षपदी राजू किणयेकर यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक मनोहर कदम यांनी केली. यावेळी निंगाप्पा मोरे, नारायण कडलीकर, माजी जि. पं. सदस्या प्रेमा मोरे, माजी ता. पं. सदस्या निरा काकतकर, माजी ता. पं. सदस्या कमल मन्नोळकर, चेतन पाटील, चंद्रकांत कोंडुसकर, लक्ष्मण हिरोजी, आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेत बेळगाव, सांगली, मिरज, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील कलाकारांनी सहभाग घेतला होता.