बेळगाव : भरधाव कार गाडीने उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रेलरला जोराची धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात हुबळी येथील 1 ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील हलगा ब्रिज जवळ घडली.
अपघातात ठार झालेल्या कार मधील दुर्दैवी व्यक्तीचे नांव गिरीश के. कुलकर्णी (वय 24, रा. कुमार पार्क हुबळी) असे आहे. जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत. राष्ट्रीय महामार्गावर काल रविवारी रात्री एक ट्रॅक्टर उसाची चिपाड भरलेले दोन ट्रेलर घेऊन निघाला होता. त्यावेळी मागून येणाऱ्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगात असलेल्या कारने (क्र. केए 63 एम 5618) ट्रॅक्टरच्या मागील ट्रेलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोराची होती की ट्रेलर उलटून पडला त्याचप्रमाणे कारच्या दर्शनीय भागाचा चक्काचूर झाला.
अपघात घडताच आसपासच्या नागरिकांसह महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने थांबून घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह पोलीस देखील त्वरेने घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त कारमध्ये अडकून पडलेल्या कार चालकासह अन्य प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तसेच रुग्णवाहिकेतून सर्व जखमींची रवानगी सिव्हिल हॉस्पिटलकडे करण्यात आली. मात्र त्यांच्यापैकी गिरीश कुलकर्णी हा जागीच ठार झाल्याचे आढळून आले. अपघात स्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहनांमुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
Belgaum Varta Belgaum Varta