बेळगाव : बुधवारी रात्री महांतेश नगर येथे युवकावर केलेला गोळीबार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रणितकुमार असे असून तो द्वारकानगर टिळकवाडी येथील रहिवासी आहे. प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या कुरबुरीबाबत चर्चा करण्यासाठी जखमी युवक व अन्य काही जण महांतेश नगर येथे घटनास्थळी जमले होते. चर्चेचे पर्यवसान वादात झाले आणि मुलीकडच्या लोकांनी प्रणितकुमारवर गोळीबार करण्यात झाले. या गोळीबारात युवकाच्या पायाला गोळी लागली असून सध्या जखमीवर बिम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. गोळीबार झालेल्या बंदुकीच्या पुंगळ्या देखील युवकाने आपल्या सोबत आणल्या होत्या. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली असून घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस आयुक्त याडा मार्टिन व उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.